मानवता...
मानवता...
मानवता...
कधी पटणार माणसाला
माणसाचीच ओळख...
की धर्माच्या नावावर
मानवताच मरत राहणार
विनाकारण...
पृथ्वीवरील स्वर्ग पाहायला
गेलेल्यांसाठी अचानक
स्वर्गाचीच दारे उघडली
धर्माच्या नावावर...
अजून किती बळी
जात राहणार धर्मासाठी..
धर्म बाजूला सारून माणसाला
कधीच जगता येणार नाही का
मानव म्हणून...
कोणताही धर्म कधीच
मानवतेला मारू पाहत नव्हता
पण काही अज्ञानी माणसांना
खरा धर्म कधी कळलाच नाही...
आज अज्ञान धर्माच्या नावाखाली
मानवतेला मारू पाहात आहे
विनाकारण विचारी माणसाच्या
मनातही विष पेरत आहे...
हे कोठे तरी आता थांबायला हवे
पृथ्वीवरील स्वर्गाचे तर
नरक केलेलेच आहे
निदान आता माणसाला माणसासारखे
जगायला तरी थोडी जागा
शिल्लक ठेवा...
नाहीतर धर्म जगेल
पण मानवता मात्र
मेलेली असेल...
©कवी – निलेश बामणे
