माणूस म्हणून जगताना
माणूस म्हणून जगताना
तुला जगायचंय न,तर नीट कान उघडे ठेवून ऐक
तुला करावंच लागेल सहन सहनशीलतेच्या पलीकडचं
रगडावच लागेलं नाक,अन मागावीच लागेल भीक श्वासांची
तुझ्या अभ्रूचे धिंडवडे उडवणाऱ्याला घालावाच लागेल सलाम..
माणूस म्हणून ओळख सांगताना करावी लागतीलच अमानुष कृत्ये.
धर्माच्या,जातीच्या,कुळाच्या विंचवाचा करून घ्यावाचं लागेल दंश..
एखादा देव घ्यावाच लागेल उरावर,वेळप्रसंगी द्यावाच लागेल स्वताचा नरबळी..
समाज नावाची गोचीड चढवून घ्यावीच लागतील चमडीवर हवं तेंव्हा रक्त शोषून घेण्यासाठी..
तुझी हुशारी,तुझं तत्वज्ञान एवढंच काय तुझ्या जीवाची ही वाटणी करून घ्यावी लागेल.
लाखो सुरे घुसतील तू फिरलास की तुझ्या पाटीत, तरीही छाती शाबूत ठेवावी लागेल परक्यांसाठीही.
इतरांच्या फायद्यासाठी करावाच लागेल तुला स्वताच्या भावनांचा लिलाव..
कितीही, काहीही झालं तरी फिरून जवाब देताना म्हणावच लागेल तुला,मस्त चाललंय आमचं..
या सगळ्या अटी कबुल असतील तर तूर्तास तरी तयार आहेस तू जगण्यासाठी.
डोळ्यावर कायम काळी फित ठेवलीस तर परवानगी आहे तुला दाखवतात तेच बघण्यासाठी..
आणि साऱ्याची फेटाळणी करून चुकून तू निसटलासच स्वताच्या तावडीतुन..
तर ध्यानात राहूदे पुतळे बांधण्यासाठी जागा राखीव आहेत,इथं महापुरुषांनाही बंधीस्त ठेवलं जातं..
आणि तरीही तू तुझाच मार्ग निवडलास तर लक्षात असुदे
इथं माणूस म्हणून ओळख सांगून माणुसकीलाही बाटवल जात..
