माझे रंगांचे हायकू
माझे रंगांचे हायकू
माझ्या रंगांच्या हायकू.
१) हिरवं झाड
वा-यावर डोललं,
मीही पाहिलं.
२) हिरवं पातं
लव लव लवलं.
पुन्हा उठलं.
३) निळं आभाळ
सांजवेळी झुकलं,
भरून आलं.
४) सावळी नदी
संथपणे वाहते,
साद ऐकते.
५) पिवळा पक्षी,
बोलतसे मंजुळ
हवेला नक्षी.
६) सावळी संध्या
निघण्याच्या घाईत,
येतसे रात.
७) आरक्त रवी,
संध्येला निरखतो,
पुन्हा लाजवी.
८) लाल गुलाब
ऊमलतो कोवळा
प्रीतिचा आब.
९) चांद मोतिया,
उगवे हलकेच
नक्षत्र नाच.
१०) नक्षत्रचुरा
दिसे आकाशगंगा
मोतिया पारा
११) शुभ्र मोगरा,
देई क्षण धुंदीचा-
जरी लाजरा.
१२) रात्र काजळी,
काजळल्या डोहात
थेंब डहूळी.
१३) गुलाबी कळी,
दिवसाच्या स्वप्नात
सांजल्या वेळी.
१४) हिरवा राघू
लालबुंद चोचीत
डाळिंब घेत.
१५) निळी निळाई,
थांग घननीळाचा
लागत नाही.
१६) निळ्याची आस
रुजते खोल उदास
खंत ही मनी.
१७) सखा वेगळा
चित्तचोर लाडका
निळासावळा.