माझे दादा
माझे दादा
बाप नावाच्या कल्पवृक्षाची
गोड फळे आम्ही चाखिली
आयुष्यभर कष्ट उपसले आम्हासाठी
स्वत:ची मात्र काया झिजविली ...//१//
केले उच्च विद्या - विभूषित आम्हा
शिक्षणाची होती फार आसक्ती
शिकाल तर टिकाल जगी
बिंबविली मनी आमुच्या ही उक्ती ...//२//
कठोर झालात कधी, पण ते क्षणिक
अंतरात मात्र माया प्रेम अपार
तुमच्या रागातच होते आमचे हित
मनास होता भक्कम कणखर आधार ...//३//
नोकरी करून मोठ्या कष्टाने
वाढविले आम्हास देऊन सुसंस्कार
आईच्या खंबीर साथीने आमुची
केली शिक्षणे - लग्ने, कर्तव्ये पार ...//४//
प्रसंगी घेतला पोटास चिमटा
आम्हा पोटभर मिळण्यासाठी
आधारस्तंभ, आश्वासक तुमचा हात
गरजा आमच्या सर्व पुरवण्यासाठी ...//५//
येता संकट थोडेही आमच्यावर
उलघाल होई तुमच्याच जीवाची
मूर्ती प्रेमळ आत्मविश्वासाची
खाण तुम्ही परोपकार नि आदर्शांची ...//६//
