पहिला पाऊस
पहिला पाऊस
झाली लाही लाही अंगी
धरणीही व्याकुळली
जीवसृष्टी तहानली
जलासाठी आसुसली ...//१//
शांत जाहला निसर्ग
रूप रम्य भासे तरी
आला अंधार दाटूनी
पक्षी परतले घरी ...//२//
वीज आभाळामधूनी
अवचित चमकली
मेघ नाद गडगडे
धार भूई कोसळली ...//३//
पहिल्याच पावसाचे
पाणी देई मोद मनी
चिंब चिंब होऊनिया
भिजू सृष्टीसवे तनी ...//४//
सुरुवात पावसाची
वाहे गार गार वारा
थंडावाच अंतरंगी
आणी अंगाला शहारा ...//५//
निसर्गाशी तादात्म्यता
कूस कधी उजवेल
कोंब कधी हा फुटेल
धान जगण्या मिळेल..//६//