मृद्गंध दरवळ
मृद्गंध दरवळ
1 min
169
आतुरता पावसाची
तृषार्तली सारी सृष्टी
वाट चातका परीच
वर आकाशात दृष्टी ...//१//
काळ्या मातीचे शिवार
सज्ज सरी झेलण्यास
अति जाहले आतुर
आभाळाच्या मिलनास..//२//
पहिल्याच पावसाचे
पाणी देई मोद मनी
चिंब चिंब होऊनिया
भिजू सृष्टीसवे तनी ...//३//
झरे निर्मळ दुधाळ
द-या, डोंगरी वहाती
वृक्षवेली आनंदली
सुखावून ती नहाती ...//४//
शुभ्र प्रपात झोकात
कडे पाषाण कपारी
धाव उंचावरूनी ती
वेग त्याचा मनोहारी ...//५//
जादुभरी सृष्टी भासे
कोकिळेचे ते कुजन
सुखावूनी आनंदात
मयुराचे ते नर्तन ...//६//
निळाईच्या पार्श्वभूमी
तृण - पाती हिरवळ
ओलसर चराचर
*मृदगंध दरवळ* ...//७//
