लोकसहभाग
लोकसहभाग
वृत्त आनंदकंद गा गा ल गा ल गा गा गा गा ल गा ल गा गा
तो पूर आसवांचा पाहून लोक गेले
सारेच ओळखीचे सोडून लोक गेले
मी प्यायलोच नाही अश्रूं शिवाय काही
पार्टीत काल माझ्या नाचून लोक गेले
रानात दूर गेलो टाळून माणसांना
तेथे शिकार माझी साधून लोक गेले
बुद्धीबळात मोठी खेळून चाल तेव्हा
मोठा वजीर माझा मारून लोक गेले
जाळात पेटलो मी युद्धात भावनांच्या
बाजार कोळशांचा मांडून लोक गेले
पैशात भाव केला आजन्म माणसांचा
प्रेता वरून पैसे फेकून लोक गेले
नाही मला कळाला व्यापार माणसांचा
पाणी विकून पैसे मागून लोक गेले
काढून काळजाला रस्त्यात ठेवले मी
लाखात लाख बोली बोलून लोक गेले
बांधू घरास आता माझ्या इथे कशाला
माझी तिथे समाधी बांधून लोक गेले
श्रद्धांजलीत माझ्या खोटे रडून गेले
फोटोस हात माझ्या जोडून लोक गेले
