करारी माय
करारी माय
बा, तू तर स्वतःला संपवलं रे
फासाची दोरी जवळ करून.
तेव्हा मायच्या कपाळावरचा चंद्रही मावळला
कधी न उगवण्यासाठी.
कोलमडली एक पत्नी पण
त्याच क्षणी एक रणरागिणी जन्मली
ती फक्त माय म्हणून.
आयुष्य तव्यावर ठेवत होती
त्यातूनच आमच्या दोन वेळच्या
भाकरीची व्यवस्था होत होती
पिठातही पाणी टाकून
दूध म्हणून दिलं पण ते देखील
अमृतासमान झालं होतं
शेतात कष्टाचं बी पेरलं तरचं
भरघोस दाण्याचं कणीस येणार
हे पक्क ठाऊक होत तिला
म्हणूनच कि काय
आम्हा भावंडात शिक्षणाचं बी रुजावं
यासाठी देहाच्या चिंधडया करत होती.
तिच्या खंगलेल्या देहात उद्याची
तळमळ दिसतं होती
मात्र टपोरे दाणे डोळ्यात
तेजाने चमकत होते.
कुठल्याही शाळेत न जाताच
तत्वज्ञान, विज्ञान, भूगोल नव्हे तर
सारेच विषय शिकणारी माय
जबाबदारीच्या जाणीवांच कोंदण
क्षणोक्षणी जपत होती.
तिचा येणारा खोकला
पाणी पिऊनच थांबवायची
'काही नाही रे बाळा', होईल बरा
म्हणून दिवस ढकलायची.
एके दिवशी मी सायब झाल्याचं पत्र आलं
अन तिचा शेवटचा खोकला
जबाबदारी संपल्याच सुख तिला देऊन गेला.
मोबा 9225794658
