खरी सुंदर दिवाळी
खरी सुंदर दिवाळी
पूर्वी होती नैसर्गिक
खरी सुंदर दिवाळी
साधे पण गोड होते
खाद्य पदार्थ फराळी..!
सुट्टी लागता शाळेला
मामा हजर व्हायचा
बैल गाडीत आम्हाला
आईसवे तो न्यायचा..!
आजी आजोबा प्रेमळ
जीव आम्हा लावायचे
मुखी निर्मळ मायेने
खाऊ दोन्ही घालायचे..!
तेल,गहू,दाळीसाळी
रेशनच्या असायच्या
स्त्रिया चविष्ट जेवण
चुलीवर करायच्या..!
दारी आकाश कंदिल
कागदाचे असायचे
हस्त कलेच्या विश्वात
मुले मुली रमायचे..!
सडा अंगणी शेणाचा
आयाबाया टाकायच्या
छान रंगीत रांगोळी
मग्न होत काढायच्या..!
माळ लौंगी फटाक्यांची
मुले फोडायची सारी
साध्या टिकल्या फोडून
मुली भरायच्या भारी..!
गेले ते दिवस आता
पुन्हा नाही दिसायचे
मोरपंखी बालपण
मनी फक्त जपायचे..!
