खरा अभ्यास
खरा अभ्यास
जीवन जगता सदैव मानव विषयाचे करी ध्यान
संगाची अभिलाषा त्याचमुळे मनी होय निर्माण
संग विषयाचा जडल्यावर पुढे काम उभा राही
सदैव धावतो काम पूर्तीस्तव मानव लवलाही
कामातुर नर काम पूर्तीस्तव करितसे धावाधाव
अपुऱ्या कामनेमुळे उपजतो मनी क्रोधाचा भाव
अति क्रोधाने मोहित होते, भुरळ मनाला पडते
मोहित मन स्मृती विभ्रम करते, विस्मृती घडते
विस्मरणाने विवेक बुद्धीचा नाश तेव्हा घडतो
बुद्धिनाश मग त्या माणसाला अधोगतीस नेतो
डोळ्याने विषयास बघता धरू नये कधी ध्यास
सुंदर जीवन सुलभ व्हायचा हाच खरा अभ्यास
