कातरवेळ
कातरवेळ
निघून गेलीस दूर सखे तू
अन् शब्द जवळ आले
सायंकाळच्या एकांताची
कातरवेळ झाले......
वेडचं असतं ना मन
उगाच येतात आठवणी..
विसरलेल्या माणसाच्या
धुणीत जगतं कुणी..
विरहयातना दाटून येता,
आकांतात न्हाले.
निघून गेलीस दूर सखे तू
अन् शब्द जवळ आले...
सोबत तू असतांना
सर्व जग होतं सोबतीला..
आज अंधार आहे, रात्र आहे.
एकांत आहे दिमतीला..
कितीतरी आठवणी तुझ्या
कवेत घेऊन आले..
निघून गेलीस दूर सखे तू..
अन् शब्द जवळ आले..
तु माझी अन् तुझा मीच
हे सत्य कशाचे, भास होता..
नव्हती कधीच माझी तू-
माझी असल्याचा आभास होता.
प्रेम हरलं-व्यवहार जिंकला,
कितीदा कानात सांगून गेले..
निघून गेलीस दूर सखे तू -
अन् शब्द जवळ आले..
जग एक नाटकचं आहे
मुखवटे माणसाचे..
आपण सर्वानांच आपले म्हणतो..
कुणीच नसतं कुणाचे.
सोपं गणित जगण्याचं,
एका क्षणात सोडवून गेले..
निघून गेलीस दूर सखे तू -
अन् शब्द जवळ आले..
किती छान निभवलसं तू,
नाटक लग्नाचं,
कसलेल्या सोगांड्याचं,
सोंग वागण्याचं.
उसवलेल्या मनाला,
ठिगळ लावून गेले..
निघून गेलीस दूर सखे तू -
अन् शब्द जवळ आले..
सायंकाळच्या एकांताची
कातरवेळ झाले....

