कारभारणे, बस जरा निवांत!!
कारभारणे, बस जरा निवांत!!
कारभारणे, आग कारभारणे ,
आग, बस जरा हिथ निवांत!
किती किती राबशील, शेतात ?
दमली आसशिल, घे जरा उसंत!!
पडलाय बघ, बरा पाऊस,
आवंदा, समदं कसं येळंवर!
पेरणी सुदीक झाली रानात,
बस, निवांत हिथ घटकाभर !!
दोन्ही पोरं आन् दोन्ही सुना,
सुखात हायेत तिकडं म्हमईला!
जावाई आन् धाकली पोर,
कलेक्टर, फौजदार देशाला !!
का करतीस ऊगा काळजी त्यांची?
येत्यात नव्ह सणासुदीला भेटायला!
डोळ्याचं आपरेशन बी केलं तुझं,
का लागलायं कंठ तुझा दाटायला?
साताजल्माची आपली पुण्याई ,
घरदार शेतभात समदं भरल्यालं!
लेकी,सुना,नातवंडं,जावाई,लेक,
समदं समदं कस बघ मनाजोगतं!!
आलं आलं ध्यानात, माझ्या आता,
दुःख कसलं तुझ्यात दाटल्यालं!
चुकली दोन वरसं, वारी विठूची ,
हेच नव्हं मनात तुझ्या साठल्यालं ?
आग, हे बी दिस जात्याल ,
म्होरल्या साली जाऊ वारीला!
पोरं, नातवंडं, सुना बी येत्याल,
नगं ऊगा घोर लावूस जीवाला!!
कारभारणे बस जरा निवांत,
कारभारणे बस जरा निवांत!!

