जीवनाचे अर्थ
जीवनाचे अर्थ
पासवर्डच्या जगात
अडकले एक मूल
मूल नव्हते ते अगदी
बागेतले एक फूल
ऑफर व कोडची
लागली त्याला आवड
रेड बस रेड बसमुळे
नाही त्याला सवड
तीन महिन्यातुन एकदा
मालक देतो पार्टी
तो मात्र चिटकला
नको शाळेतली कार्टी
पुण्यात मी आलो म्हणुन
किती चांगले झाले
स्किल मी शिकलो पण
गाव किती लांबले?
एसी रुम सारखे जर
बाहेरचे जग असते
गावा-गावात गल्ली बोळात
दुकान मी थाटले असते
काम चांगले करुन
मी मिळवले प्रमोशन
सहा हजारात कसे भागेल?
याचे येते टेन्शन
होली है होली है
सगळ्यांनी रंग फासला
कोरड्या रंगाच्या गर्दीत
थोडा ओलावा दिसला
कॉर्पोरेटच्या दुनियेची
मी नवी चव पहातोय
चुलीवर उकळलेला चहा
आता नको वाटतोय
थोडी स्टाईल थोडा बदल
यालाच का जगणे म्हणतात
बर्गर पिझ्झा खाण्यासाठी
लोक रांगेत का थांबतात?
मोबाईल कम्प्युटर मध्ये
मी एक्सपर्ट झालो
खेड्यातले जगणे नको मला
एसी चा दास झालो
ऑल इंडिया कस्टमर
मी बघा हँडल करतो
कस्टमर कसे खुश
याचे मॅनेजर नवल करतो
चार लोकात बसल्यावर
जगणे मला कळले
गावात राहुन काय उपयोग
इथं नशीब फळफळले
बेकारीचा राक्षस पाहुन
छातीत धस्स होते
असले जगणे नाही वाट्याला
मन थोडे सुखावते
नियमबद्ध शिस्तबद्ध
जीवनाचे नवे अर्थ
गर्दित, धक्काबुक्कीत
जीवनाचे नवे क्षेत्र
उघड्या डोळ्यांनी पहातो
भौतिकवादाचा डिस्को नाच
संस्कृतीचा रोजचं -हास
अन् विकृतीचा नवा जाच
माणसा माणसांची शर्यत
अन् सगळीकडे पळापळ
जीवघेण्या वेगाने जीवन
पानांची कळत नाही सळसळ
विक एंडला नक्की येतो
धाब्यांना भयंकर महापूर
सगळेचं खात सुटतात
पैशांचा करतात चक्काचूर
असल्या विपरीत गोंधळात
मन हाका मारु लागते
एसी मधल्या हवेतुन
सुटका मागु लागते
शरीर अवघे चटावलेले
मनाचे काही ऐकत नाही
साध्या सरळ जगण्यात
अर्थचं वाटत नाही
सिमेंटच्या जंगलात रोजचं
विकासाचा अर्थ शोधतो
मग तोपर्यंत जगण्यातील
राम निघुन जातो