जीव
जीव
येरे येरे पावसा म्हणता म्हणता पाऊस तर आला होता,
पण येताना नद्यांना ओसंडून वाहून घेऊन गेला होता.
समजलं नव्हतं कधी गावात पाणी आलं होतं,
पाहताक्षणी दाही दिशेला पाणी पाणी आणि फक्त पाणीच उरलं होतं.
एवढ्या पाण्यात जीव अडकलेला होता,
आणि जीवाचं फक्त पाणी झालेलं होतं !
जीव महत्वाचा होता म्हणून सगळा संसार सोडून बाहेर पडावं लागलेलं,
गोठ्यात मात्र गाई म्हशी तसंच हंबरडा फोडत उभं राहिलेलं.
घर-दार संसार तर सोडला पण जीव मात्र घरात घुटमळलेला,
कोसळणार्या भिंतींमध्ये तग धरून उभारलेला.
जीव ओतून कष्ट केलेलं शेत पाण्यात गेलेलं,
पोरा बाळांना कसं जगवायचं ? म्हणून आईचं हृदय तळमळलेलं.
मुलीचे हात हळदीने पिवळे करायचे ठरवलेले,
वाहून गेलेल्या संसारात पै-पै कमवून बनवलेलं दागिणे कपाटातच राहून गेलेले.
पापण्याच्या कडा ओलावलेल्या पण आता अश्रू अनावर झालेले,
आयुष्याच्या आधाराला डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहिलेले.
पाणी आज होतं तर उद्या जाणार होतं,
पण संसाराचं काय?
तो परत कसा उभारणार हे कोण पाहणार होतं?
काय उरलं असेल ते माहित नव्हतं?
फक्त वाचलेल्या जीवाचं गाठोडं सोबत राहिलं होतं.
अश्रूचा बांध फुटला तरी मदतीचा हात हातात होता,
तो हात हातात घट्ट धरून परत त्या पाण्यावर अख्खं आयुष्य उभं करणारा जीव सोबत होता...
