जाहीरनामा
जाहीरनामा
स्त्री म्हणजे
चार भिंतीतली बोन्साय
एवढीच तिची ओळख ... शतकानुशतके
परंतू ... सावित्रीमाई
तू जन्मलीस नी स्त्रीची व्याख्याच बदलली
अवदसा ' पापीणी ' पांढऱ्या पायाची वगैरे ...
काळीज चिरत जाणारी बिरूदही नामशेष झाली
तू प्रज्ञासूर्य, आद्यशिक्षिका, क्रांतीकारी
संबंध स्त्रीयांची कैवारी
जात धर्म वर्ग भेदांपलिकडे जाऊन
अंगाखांद्यावर शेण , माती , दगड झेलून
केलीस महायुद्ध सनातन्यांसमवेत
मोठया धैर्याने जिंकून घेतलीस
आभाळ कवेत
शुक्रतारा होऊन
दाखवलीस प्रकाशवाट
निरक्षर अज्ञानी स्त्रियांना
अनिष्ट रूढी परंपरांचे समीकरणे बदलून
प्रसिद्ध केलीस
' स्त्री शिक्षणाचा ऐतिहासिक जाहीरनामा '
मुक्त केलसं
स्त्रीयांना स्त्रीबंधनातून कायमच
आज
साक्षर होऊन
किर्तीशिखरे चढताना
दुर्गा काली हिरकणी म्हणून
नावाची जयक्रांती होताना
तुझी आविष्कृत झालेली
महान मूर्ती
कधीच विरघळणार नाही
आमच्या डोळ्यातून पिढ्या न् पिढया
कृतज्ञता म्हणून
