हिरवी वनराई
हिरवी वनराई
सरला रिमझिम श्रावण
भाद्रपदात दिसे हिरवाई
सारी सृष्टी सजून बसली
बहरली मनभावन वनराई....
शृंगार केला वसुंधरेने
लेऊन हिरवा साज
तरुवेलींचा सजली मैफिल
काय वर्णावा तिचा बाज ....
जलथेंबाची झाली वृष्टी
हरित तृण गेले भिजून
मोत्यासम दिसायच्या नादात
वहायचं गेलं राहून....
हिरव्या वनराईने सजला
अद्भुत हिरवागार निसर्ग
पालवीची माया दाटली
जणू भासे धरतीचा स्वर्ग....
मनमयुर नाचे अंगणी
मुक्त फुलवून पिसारा
वाऱ्याच्या बासरीवर डोले
धरेचा कणकण सारा....
