हा पाऊस
हा पाऊस
हा पाऊस पडतो अवेळी
स्वप्नांची होते दाटी
एक जीव झुरतो कधीचा
आतून तुझ्याचसाठी
भूईला सुटतो गंध
उरात उठती शहारे
स्मृतीचा फुले फुलोरा
अश्रूंचे ओले पहारे
मी मिटून घेतो तेव्हा
डोळ्यांच्या वरचे कुंपण
हृदयाच्या मलमलीवरती
अश्रूंचे करुनी शिंपण
हृदयास फुटतो पाझर
यातनांच्या डोहाकाठी
एक जीव झुरतो कधीचा
आतून तुझ्याचसाठी