तुझा भास
तुझा भास
त्या तिथे जळाकाठी
सांजेच्या घडीला
तुझा भास होई मज
नदीच्या थडीला
खळखळत्या जळातूनी
सूर तुझे येई
झुळझुळत्या गारव्याने
मी शहारून जाई
आसुसलो पुन्हा सखे
मीलनाच्या गोडीला
त्या तिथे जळाकाठी
सांजेच्या घडीला...
भास म्हणू सखे तुझा
की वेड म्हणू माझे
आज पुन्हा क्षण जुने
होऊन जाती ताजे
अंतरीच्या दोन खुणा
असे माझ्या जोडीला
त्या तिथे जळाकाठी
सांजेच्या घडीला...