गझल
गझल
माणसांनी माणसांचा मांडला बाजार येथे
काळजाच्या वेदनेचा थाटला व्यापार येथे
रंग आता आरशाचा तोच विरला का कळेना
तीच सच्चाई दिसेना संपला आचार येथे
छाटल्या फांद्या कितीही तोडली झाडे हजारो
का मुक्या त्या भावनांवर नित्य केले वार येथे
ठेवली बांधून लज्जा भाव पैशालाच आला
दीडदमडीच्याच साठी होत हे लाचार येथे
मोल घामाला मिळेना ते लटकती बारमाही
अन्नदात्याचा जणू हा चालला एल्गार येथे
