गझल:- माझा स्वभाव नाही
गझल:- माझा स्वभाव नाही
खोट्यास वाकणारा माझा स्वभाव नाही
सत्यास त्यागणारा माझा स्वभाव नाही
घेऊन जा तुझे तू ताजे गुलाब सारे
प्रेमात भंगणारा माझा स्वभाव नाही
घनघोर वादळांशी आलो लढून येथे
युद्धात हारणारा माझा स्वभाव नाही
केलेत माफ सारे मोठे गुन्हे तुझे मी
सूडात पेटणारा माझा स्वभाव नाही
पोहून पार केले लाटेस सागराच्या
डबक्यात साचणारा माझा स्वभाव नाही
शत्रुत्व नष्ट केले केव्हाच मी तुझ्याशी
आजन्म भांडणारा माझा स्वभाव नाही
शब्दांस मानतो मी आयुष्य आज माझे
अर्थास छेडणारा माझा स्वभाव नाही
रानात झेलतो मी पाऊस आसवांचा
दु:खात संपणारा माझा स्वभाव नाही
