घटस्फोट
घटस्फोट
सुदैवाने असे काही घडायाला हवे होते
तुझे माझे सखी थोडे पटायाला हवे होते
दुरावा शेवटी आला तुझ्या माझ्याच वाट्याला
नशीबाचे जरा धागे जुळायाला हवे होते
चुकावे मी किती वेळा चुकावे तू किती वेळा
चुकांपासून दोघांनी शिकायाला हवे होते
किती अश्रू तुझ्या माझ्या असे डोळ्यात आलेले
जरा थांबून दोघांनी रडायाला हवे होते
तुझ्या माझ्या अहंकारात संपावे किती नाते
जरा नाते सखी तेव्हा जपायाला हवे होते
किती घाई इथे आहे ऋतूंनाही निघायाची
वसंताने घरी माझ्या रहायाला हवे होते
उशीराने कळाले ना तुलाही अर्थ नात्यांचे
जरा आधी सखी सारे कळायाला हवे होते
