एकांताच्या कुशीत
एकांताच्या कुशीत
आयुष्यातल्या घटना घडत जातात.
त्या वेळेला सुचेल तसे, स्वत:च्या स्वभावाला रुचेल तसे
तर कधी स्वत:च्या स्वभावाच्या विरुद्ध वागून आपण वेळ सारून नेतो.
कधी सुखाचा एखादा मोठासा श्वास घेतो... एकट्यानेच
तर कधी दुखाची किंकाळी मारतो... तीही एकट्यानेच.
पण
कधीतरी एकांताच्या एकाच्या क्षणी गेलेल्या
भूतकाळाकडे आपण तटस्थ नजरेने बघतो.
तेव्हा त्याक्षणी सुखदु:खाची कित्येक न उलघडलेली
गणिते सहज सुटतात.
ज्या गोष्टीला आपण आयुष्यभर आपल्याहून जास्त महत्व देऊन त्या गोष्टीसाठी
दु:ख करत राहिलो, तितकी रडारड खरच गरजेची होती का?
दु:ख केलेली कित्येक कारणे ही खरंतर आपली दु:ख नव्हतीच.
पण तरीही आपण ती स्वत:वर ओढून का घेतली?
एखाद्या भितीकडे स्पष्ट नजरेने भिडण्याची ताकद देतो एकांत.
मी कसा आहे? तो कसा आहे? हे असं का घडलं? माझं खरंच चुकलं होतं का?
कि तोच पूर्ण चुकीचा होता?
एकांतावर रागावणारा माणूस स्वत:शी खोटं बोलत असतो.
एकांत बोलका असतो. ऐकावं मन लावून.
एकांताने दिलेली उत्तरे कधी दुर्लक्षु नयेत.
एकांत खरा असतो..काचेसारखा...प्रामाणिक.
तो कधीच आपली खोटी समजूत काढत नाही...
