पाऊस
पाऊस
मला धुक्यात जायचंय
ढग उतरायला हवेत खाली
अंगावर काटा यायला हवा,
मोठा श्वास घेऊन धुकं आत घ्यायचंय
जाऊ दे तो थंडावा आतवर... खोल...
पाऊस पडायला हवा... बेफाम... तुफान
सरीमागून सरी... पाठोपाठ...
भिजून भिजून अंग गोठायला हवं,
हातावर पाण्यानं सुरकुत्या पडायला हव्यात.
नजर स्वच्छ व्हायला हवी... शरीर थकायला हवं
पानावरचा एक थेंब मी हळूच डोळ्यात सोडेन...
एक शहारा डोळ्यांतून उतरून पावलांना चुंबून मातीला भेटायला हवा
उंच कुठल्या तरी डोंगरावर मला स्वतःला सोडून द्यायचंय,
स्वत:ला तिथंच सोडून वाऱ्याला मनापासून भेटायचंय...
इतकं केल्यावर तरी मन भरेल का? की रितं होऊन जाईल?
