दादा, मी वाट तुझी पाहीन
दादा, मी वाट तुझी पाहीन
मायबाप सरकारने, बापाच्या इस्टिटत म्हणे, मुलीलाही दिलाय वाटा,
बहिणभावाच्या प्रेमाला मला तरी वाटत ह्यामुळेच फुटलाय फाटा
दादा, तुझ्यात आणि माझ्यात आहे एकाच बापाचं रक्त,
इस्टिटीपोटी तू स्वार्थी होऊ नकोस फक्त
नको तुझी संपत्ती नको मला वाटा
तुझ्या माझ्या प्रेमाचा दादा नको आटवू साठा
ह्यावेळी तू भाऊबीजेला ताटात बक्कळ ओवाळणी टाकली,
तितक्यात वहिनी माझी कानात तुझ्या काहीतरी पुटपुटली
तसाच हसतहसत तू कागद पुढे केला
ताई ह्यावर सही दे हे तू किती सहजच बोलून गेला
"आता माहेरही परकं होईल"?
हा विचार मनात माझ्या धडकी भरून गेला
नको मला संपत्ती नको मला वाटा
फक्त इतकंच सांग दादा, मी सही केल्यावर, बापाच्या हयातीत जशा मोकळ्या होत्या,
तशाच मोकळ्या राहतील ना मला माहेरच्या वाटा
नको घेऊस चोळी नको मला साडी,
येईल ओढीने वर्षातून तुला दोनदा भेटायला
इतकीच नात्यात आपल्या राहू दे गोडी
माय बापानंतर म्हणे, पोरीचं माहेरही जातं
एकदा स्वतःची लेक मोठी झाली की,
भावाला बहिणीचं प्रेम कुठं लक्षात राहत
भाऊबीजेला ओवाळून ती तुला राखीही बांधत जाईल,
आई ताईप्रमाणे दादा लेक तुझी काळजी घेईल,
पण दादा, ह्या दोन सणांना तरी तू घ्यायला येशील
या आशेने मी वाट तुझी रे पाहत जाईल
मी वाट तुझी रे पाहत जाईल..!
