STORYMIRROR

Pandit Warade

Romance

2.5  

Pandit Warade

Romance

चंदनी गंधात

चंदनी गंधात

1 min
14.1K


चंदनी गंधात रंगली रात सखे तव संगतीत

सोड तुझी उबदार मिठी गं उजळला हा आसमंत ।। धृ ।।


शुष्क वृक्ष हा पळसफुलांचा तव सहवासे मोहरला

पर्णे गळाली तरी दारचा गुलमोहर फुलूनि आला

फुलल्या, खुलल्या दिशा दहाही फुलला असे पारिजात ।।१।।


मंद गंध हा रातराणीचा रोमरोमातून दरवळला

रंग गुलाबी प्रणयफुलांचा गालावर अंकित झाला

बहर ज्वानीचा कैफ बनूनि उतरला तव नयनात ।। २ ।।


लोपल्या लाजून तारका चंद्र नभीचा लाजला 

दूर कुठूनसा भूपाळीचा स्वर अलगद कानी आला

मंद पवन हा घेऊन येई उषःकालचे संगीत ।। ३ ।।


पूर्वेला गिरी शिखरामधुनी गुलाल कुणी हा उधळला

लज्जेचा लालिमा जणू हा क्षितिजावरती ओघळला

तांबूस पिवळी रविकिरणे बघ उभी ठाकली दारात ।।४ ।।


पक्षी किलबिल गाती, झाली सृष्टी चराचर जागृत

गोड गुलाबी स्वप्नांच्या तू सखे अजून का धुंदीत 

गुपित आपले दोघांमधले जपून ठेऊ या हृदयात ।। ५ ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance