भेट तुझी-माझी
भेट तुझी-माझी
पहाटवारा सोनसकाळी
सजली अवनी भारी गं
ये भेटाया मज भल्या पहाटे
हिच माझी ललकारी गं
गूज प्रीतीच्या प्रणयाचे
अलवार ओठी फुलले गं
निष्पर्ण झाडाच्या फांदीवरती
दो जीव प्रेमात तरले गं
रानोमाळ हिंडताना
विसावेन मी तुझ्यासवे गं
मन मयुराचे जिंकून घे
उडवूनी प्रेमाचे थवे गं
भास्कराचा केशरसडा
भुलवतोय आज मला गं
तुजसवे प्रणयाचे गूज
करण्या मजसी रिझवतोय गं
मोर मी मोरणी तू माझी
प्रणयात प्रीत जागवू गं
क्षितिजाच्याही पलिकडे
सुखसौख्याची साथ निभवू गं

