भेट आठव आपुली
भेट आठव आपुली
भेट आठव आपुली, चंद्र साक्षीत घडलेली
हात तुझा घेउनी हाती वचने ती दिधलेली
गंध स्मरतो सुमनांचा थंड हवेचा गारवा
धुंद रात्रीत मिळुनिया, गोड गायिला मारवा
किती सुरेल सुरात चांदरात रंगलेली
भेटआठव आपुली चंद्र साक्षीत घडलेली
फुले गंधित हसली, पाहूनी अबोल प्रीत
वदली ती हळुवार , हीच असे प्रेम रीत
ऐकताच शब्द कानी, अलवार उमललेली
भेटआठव अपुली चंद्र साक्षीत घडलेली
आज आलो तेथेच तोच चंद्र पहा हसला
आठवून ती रात्र, वृक्ष ही फुलांनी बहरला
जणु आपुली प्रीती ही , मनातून स्मरलेली
भेट आठव अपुली चंद्र साक्षीत घडलेली

