भौतिक सुखाच्या बेड्या
भौतिक सुखाच्या बेड्या
ना मंदिरातली पूजा फळली
ना मजला रोजे कामी आले
काळ सर्वोत्तम गुरु असतो
त्यापुढे कुणाचे काय चाले ??
माझं माझं करता करता
हाती असलेलं सारं गमावलं
श्वास तेवढे चालताहेत बरोबर
बाकी उमगेना मी काय कमावलं
सांगत होते पादचारी येता जाता
आतातरी थांबव मुशाफिरी वेड्या
पिंजरा अदृश्य असेल नियतीचा
भौतिक सुखाच्या पडतील बेड्या
हसण्यावारी नेलं सारं तेव्हा
आज आसवांचा बांध फुटतो
तसा नेम नसतोच सोबतीचा
चालता चालताही हात सुटतो
एकटं पडल्यासारखं होतं कधीकधी
जरी लाखोंचा गराडा अवतीभवती
नेकीने चालत राहायचं अशावेळी
कर्म देतात नेमकी पोचपावती
शेवटी मातीतच जायचं आहे
फक्त, बोल तेवढे राहतात
काहींना उघड्या डोळ्यांनी दिसतं
तर काही अंतर्मनातून पाहतात
