गझले तुझ्या नशेने
गझले तुझ्या नशेने
1 min
142
झाले असेल माझ्या हातून पाप काही
का याचना क्षमेची मंजूर होत नाही
संसार एकट्याने झाला कधी कुणाचा
जर मी असेन राजा राणी म्हणा तिलाही
आयुष्य पास होण्या लाखो दिल्या परीक्षा
नापास होत गेलो वार्षिक कधी तिमाही
सोडून हात माझा गेलीस का अशी तू
केली कधीच नाही पर्वा प्रिये जराही
शेतात थेंब माझ्या येतो कधीतरी, पण
डोळ्यात आसवांचा हा पूर बारमाही
वृत्तात गझल रचण्या दमछाक फार होते
भलतेच कसब लागे वाटे तशी सजाही
गझले तुझ्या नशेने बेधुंद जाहलो मी
पर्वा मला न त्याची बदनाम मी तसाही
