भासवेडा
भासवेडा


सागरगर्भ क्षितिजावरला, जिथे तेज रवीचे गिळतो
घेऊनी तुझी भ्रांत तिथे हा भासवेडा फिरतो
सुवर्णही लाजे एक घटिका, मुखतेज पाहता जियेचे
होतो आतुर चंद्रही पाहण्या, मुखकमल माझ्या प्रियेचे
जागेपणी अन शयनात माझ्या, मी पाहतो स्वप्नं तियेचे
नजरेतून मज बोलावणाऱ्या, माझ्या स्वप्नंप्रियतमेचे
जगात जिथल्या अस्तित्वाचा, भाव खरा विरतो
घेऊनी तुझी भ्रांत तिथे हा भासवेडा फिरतो
विवाह माझा रोज थाटती, शब्दथवे मनशाखेवरले
लिहून तुला कल्पनांत माझ्या, कसे सांगू कितीदा स्मरले
घेऊन माळ तारकांची हाती, नभांगणी तुला वरले
माझ्या गीतझंकारांनी, इथले बागबगीचे फुलले
ज्या चलांच्या उंबरठ्यावर, आभास तुझा सरतो
घेऊनी तुझी भ्रांत तिथे हा भासवेडा फिरतो
वाटते कधी भेटावे तुजला, तोडून पाश सारे
संगमास आपल्या तनांच्या, सांग इतका अवकाश का रे
उघड ना आता एकदा मजसाठी, तुझ्या घराची दारे
भेटीन तुला एकटीला, सवे घेऊन शब्द सारे
येऊन तुझ्या स्वप्नांत साजिऱ्या, शशीराज जिथे घुटमळतो
घेऊनी तुझी भ्रांत तिथे हा भासवेडा फिरतो