बाळा
बाळा
तुझ्या कोवळ्या हातांनी
घाल पिंगा माझ्या बाळा
दुडूदुडू पावलांनी
लाव लळा हा कोवळा
तुझ्या नाजूक ओठांनी
मुखी घे रे मऊ भात
सांजवेळ ही उरात
माथ्यावरी देवाचिया हात
तुझ्या बोबड्या बोलांची
ओठी कशी चुळबूळ
मनी हास्याचे काहूर
दाटे मायेचा पाझर
तुझ्या डोळ्यांची चमक
घनदाट सावली ही
आई भारावून जाई
डोळा भरूनिया पाही
चिमुकल्या पावलांनी
सर कर पाऊलवाटा
असा ढग बोलतो रे
समंदराचिया लाटा
तुझं पहिलं पाऊल
बाईपणाची चाहूल
ओंजळीत मोतियाची
जणू चांदण्यांच्या राती
तुझा लुकलुकणारा दात
जणू उगवे प्रभात
सोनियाच्या किरणांनी
आई वाटे साखर पाक
लाही लाही भाळते रे
गुण पाहुनिया बाळा
धडधड काळजात
माथी कोरे काळा टिळा
तुझ्या जन्माचिया वेळा
आठवुनी रे माय
चिंबचिंब पाणी डोळा
बाप भिजतो सावळा
नखा नखा ची नजर
ओवाळुन टाके आजी
काही भाबड्या डोळ्यांनी
तो प्रेमळ रे आजा
तुझ्या पायातल्या वाळा
जाणु बरसती श्रावणधारा
झुंजूमुंजू कानी नाद...
मनी आनंदाच्या गारवा
मनी आनंदाच्या गारवा
