अशी असावी कविता
अशी असावी कविता
काळजात जन्मलेली,
ओठातुनी फुललेली ।
अशी असावी कविता,
मनी भाव रुजलेली ।।
अशी असावी कविता,
झेप आकाशी घेणारी ।
ग्रह ताऱ्यांना भेटून,
पुन्हा यावी भूमीवरी ।।
प्रेम वात्सल्य आईचे,
गाते खळखळून ती ।
पुत्र गोंडस साजरा,
तसे शब्द यावे हाती ।।
अलंकार प्रतिभाने,
सुशोभीत प्रकटावी ।
साधी सोपी सरळता,
भाषा मुढास कळावी ।।
दुःखी पीडितांच्या घरी,
तिने जावे मनातून ।
त्यांच्या व्यथा त्या पाहून,
मांडाव्यात काव्यातून ।।
धीर देणारी असावी,
बाप होणारी असावी ।
भुकेलेल्या बालकाची,
माता यशोदा ती व्हावी ।।
येतो श्रावण जसा की,
व्हावी ती हिरवीगार ।
प्रेमगीत सप्तरंगी,
नाचे करूनी शृंगार ।।
बीज अंकुरावे तसे,
मनी फुलून ती यावी ।
फळे रसाळ मधाळ,
तिच्या अर्थाने चाखावी ।।
नवरस सजलेली,
अन्यायाला फोडणारी ।
कधी होऊन विद्रोही,
प्रश्न गूढ मांडणारी ।।
समाजाचे प्रबोधन,
व्हावे शब्दा शब्दांतून ।
पिढी सुधारावी पुढे,
सुविचारी काव्यांतून ।
अशी असावी कविता,
श्वास व्हावी जीवनाची ।
संजीवनी ती देणारी,
कुपी व्हावी अमृताची ।।
