पहिला पाऊस
पहिला पाऊस
पहिला पाऊस सैरभर
पडला सर्वत्र अंगणी ।
पाहताच तुला सखे
तू स्थिरावली नयनी ।।धृ।।
नव्हते बघितले कधी
असे निलकमल सुंदर ।
त्यावर ओघळू लागले
मोतीरूपी थेंबाची धार ।।
दिसले मनोहारी तुझे
प्रतिबिंब या अवनी ।।१।।
लाल-गुलाबी ओठ
जलास प्राशुनी भिजले ।
केसांची बट ढळुनी
अर्धनयनी लपटले ।।
धुंद नजरेला मिळाली
बेधुंद नजरेची साजणी ।।२।।
पहिला पाऊस ओघळला
सुकोमल कायाच्या अंतरी ।
मन ही चिंबचिंब झाले
बरसल्या प्रेमाच्या सरी ।।
एकमेकांनी झोकून दिले
भेट झाली मनोमनी।।३।।
ओल्या देहास स्पर्शुनी
गंध कस्तुरीचा दरवळला ।
प्रेम-प्रीतीची घट्ट मिठी
अंगी मोरपिसारा फुलला ।।
तनमन डोलू लागले
श्वासात श्वास रोखुनी ।।४।।
तू हसली लाल ओठी
खळी गालात उमटली ।
मी हरवलो गं तुझ्यात
जशी उर्वशी मज भेटली ।।
स्वप्न म्हणू की मृगजळ
बघतो याच लोचनी।।५।।
वसुंधरेचा सुहास भारी
मन प्रफुल्लित बहरले ।
वाऱ्याची येता झुळूक
तनुवरी शहारे उमटले ।।
भिजावी प्रेमाची नाती
म्हणून वर्षावला तनी ।।६।।
अनुभवला पहिला पाऊस
कोरून बसला स्मरणात ।
किती सरींवरी पडल्या सरी
पुसल्या न कधी मनात ।।
पडता पहिला पाऊस
जाग्या होतात आठवणी ।।७।।
पाहताच तुला सखे
तू स्थिरावली नयनी ।।धृ।।
