अनुपम सृष्टी
अनुपम सृष्टी
राम प्रहरीचे
विहंग गायन
अमृत सरिता
तरळे लोचन....1
हरित गालिचे
भुई अंथरूण
दवबिंदू पर्णी
सुवर्ण कोंदण....2
अवचित दाटे
मेघ गिरिवर
संमार्जन करी
थेंब धरेवर.....3
जीव अंकुरतो
क्षितीच्या उदरा
बघता छेदी तो
गगन बावरा.....4
निर्गुण सरिता
आलंगिते झरा
भरून पावते
भेटून सागरा.....5
अत्तर कुपित
सुमन सुगंध
गर्भि लपविले
जुने अनुबंध.....6
ताठ तरुवर
रेटून अंबर
रंग वितळते
सांज मनोहर....7
सुवर्ण भास्कर
शित सुधाकर
चांदणे तरंगे
शुभ्र सरोवर.....8
नीरज नीरज
भ्रमर गुंजती
मधुपांनासवे
हरखून जाती.....9
अनुपम रूप
साजरे सुंदर
मोहरुन जाई
जीव सृष्टीवर....10
