आजचा बाबा
आजचा बाबा
पूर्वी कणखर होता
आता हळवा बराच
नवा युगाचा तो बाबा
झाला मवाळ खराच ll
आता बाळासवे बाबा
होई सहज बालक
सारे करी आवडीने
नव्या पिढीचा पालक ll
आई आज्जीच्या तोडीस
रोज गातो तो अंगाई
सूर ताल जरी कच्चे
नंदलाल झोपी जाई ll
कामावर तो जाताना
पाय निघता निघेना
निरागस डोळे सांगी
बा, तू जाऊ नकोना ll
आजारपण पिल्लाचे
होय त्याचा थरकाप
रात्र रात्र जागरण
निजे सकाळी हा बाप ll
सुकुमार, पहिले ते
टाके पाऊल डोलत
मन खाई हेलकावे
आनंदतो अंतरात ll
शब्द पहिला वहिला
"बा"बा" पडतो कानी
चाफा दरवळे जणू
असा खुलतो हा मनी ll
दिन शाळेचा पहिला
पाणी याच्या डोळ्यात
तासा भराचीच शाळा
काटे फिरती डोक्यात ll
मोठे होता बाळराजे
करी खुशाल तो खोडी
आई रागवते पण
बाबा होय सवंगडी ll
आता हात थोडा थोडा
सैल बाबाचा रे झाला
पिल्लू मोठं झालं कधी
बाबा तेथेच राहिला ll
