आयुष्याचे रंगीत रस्ते
आयुष्याचे रंगीत रस्ते




आयुष्याचे रंगीत रस्ते
कधी बंद तर कधी खुले
कधी बोचती बाभुळकाटे
कधी साजिरी गोड फुले ।
कधी खळाळे अवखळ नीर
कधी पूरातून गाव रिते
कधी सुखाचा झरा आटतो
दुःखाला कधी उर फुटे ।
कधी पहाटे दिनकर जागे
घेऊन संगे नवा किरण
कधी आशा तर कधी निराशा
कधी निशेचे शांत शरण ।
कधी एकदा वारा व्हावे
पराग घ्यावा सुमनांतून
कधी होऊन वादळ गहिरे
दुःख लुटावे दुनियेतून ।
कधी होऊनि एक पाखरू
भेदून जावे गगनाला
कधी धरणीशी नाळ जोडोनि
अर्थ मिळावा जगण्याला ।
कधी रुजोनी मातीमध्ये
आपुले जगणे व्हावे सुंदर
उच्च विचारी वृक्ष होऊनि
जमिनीला ना द्यावे अंतर ।