समयासी सादर व्हावे
समयासी सादर व्हावे


संगतीला जीवनगाणे
मी गात गात चालावे
सुख-दुःखाच्या साथीने
एक अतूट नाते व्हावे
पडतील प्रश्न बहात्तर
मी उत्तर देऊन जावे
प्रत्येक क्षणाक्षणाच्या
समयासी सादर व्हावे
मी विहर घेत आकाशी
शिखरांना चुंबीत जावे
मी स्वयंप्रकाशित दिवटी
तिमिराला सारून न्यावे
या विशाल सागरात
घेती लहरी हेलकावे
तारण्यास जीवननौका
समयासी सादर व्हावे
या अबोल जीवनवाटा
शब्दांनी फुलवीत जावे
क्षण ओझरत्या श्वासांचे
मनभरून जगून घ्यावे
कधी तटस्थ पर्वत व्हावे
कधी चंचल जल व्हावे
या रंगीत आयुष्याच्या
समयासी सादर व्हावे।