आठवण तुझी......
आठवण तुझी......
रांगोळीत रंग भरताना,
आठवण मला तुझी झाली....।।
तुझ्या आठवणींच्या रंगांनी,
आज माझी रांगोळी सजली...।।
फुलांची माळ गुंफताना,
आठवण मला तुझी झाली....।।
मनातील माझ्या भावनांची,
फुलांच्या माळेत गुंफण केली....।।
देवाची पूजा करताना,
आठवण मला तुझी झाली....।।
देव्हा-यातील देवाला,
भेटीची तुझ्या मागणी केली....।।
सोळा शृंगार करताना,
आठवण मला तुझी झाली....।।
आरशात पाहूनी मला,
लाजेने मान खाली गेली ....।।
पंगतीला ताटावर बसताना,
आठवण मला तुझी झाली....।।
तुझ्या आवडीची बासुंदी,
तुझ्यासाठी राखूनही ठेवली...।।
भेटशील तु एकदा तरी,
जगत राहीले एका आशेवर..।।
येशील ना माझ्या समोर....
शेवटचा श्वास संपण्या अगोदर...।।
