आराध्य ईश्वर (आई)
आराध्य ईश्वर (आई)
चरणी तुझीया स्वर्ग सारा
कुशीत समावे विश्व सारा।
जग हा जळता निखारा,
पदर तुझा मायेचा निवारा।।
तुच माझी आराध्य देवता,
पाऊल जगती हे ठेविता।
श्वास प्राण जीवनदाता,
कसे फेडू तुझे ऋण हे माता।।
सात जन्म ही अपुरे पडतील,
कोहिनूर हिरे फिके पडतील।
प्राण जरी तुजला अर्पिल,
तुजपुढे सर्व तोकडे पडतील।।
संस्कार शिकवण तुच दिली,
भोळी भाबडी माया दिली।
देऊन इतके मोल न याचली,
सदाच होती ओंजळ भरली।।
तुझी जागा कुणी न घेई,
इतकी माया कुणी न देई।
ऐक विनंती एक कवणाई,
प्रत्येक जन्मी तुच हो आई।।
जरी असली तू आकाशी,
जीव टांगून बाळापाशी।
सदा हित कर पाठिशी,
आजही तारतेस येवून स्वप्नाशी।।
