आधी
आधी
गळून जाण्याआधी,
वसंत घ्यावा पाहून,
झळ ग्रीष्माची येण्याआधी,
सरींत घ्यावे न्हाऊन!
खेळ असतो सरण्यासाठी,
हि जाणीव उरात ठेवून,
वय सरते विसरून थोडे
थोडे खेळात जावे रमून!
खळखळते होऊन पाणी
थोडे शिकून घ्यावे "वाहणे",
झाडांच्या डोळ्यांमधूनी
थोडे शिकून घ्यावे "पाहणे"!
हि रीत जगाची आहे
अंधार यायचाच घेरून,
अस्ताला जाण्याआधी
थोडा प्रकाश ठेवू पेरून!
"ती" झोप लागण्यापूर्वी
एक दिवा ठेवू या लावून,
सरणावर जाण्याआधी
एक गीत घेऊ या गाऊन!!
