त्याचा चाबूक लालेलाल
त्याचा चाबूक लालेलाल
अशाच लाल रंगाची एक गंमत, अक्षया आणि विजय लहानपणापासूनचे मित्र. अगदी पहिली पासून एकाच वर्गात, सातवीपर्यंत तर धिंगा मस्ती, मारामारी, सतत चालू असायची.
आठवीपासून मात्र अक्षया लांब लांब राहू लागली. अंगाशी येऊन मस्ती करेनाशी झाली.
ती अशी का वागते ते विजयला देखील समजत नव्हते .
दोघेही एकमेकांशी बोलायला संकोचत होते, मात्र रोज एकमेकाची उपस्थिती नोटीस करत होते. एकमेकाची खबरबात ठेवत होते. एकमेकांच्या मित्र-मैत्रिणीकडून खुशाली विचारून घेत होते.
असे करता करता बारावीचे वर्ष पार पडले, आता यांच्या वाटा वेगळ्या होणार होत्या.
त्यादिवशी विजयने डेरिंग करून तिला एक पुस्तक वाचायला दिले ,ते नाटकाचे पुस्तक होते. त्याचे नाव होते "प्रेमा तुझा रंग कसा" त्यामध्ये एक प्रेम पत्र लिहिले आणि तिला सांगितले .
"अक्षया" माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे .अगदी पहिलीपासून मला तू आवडतेस .जेव्हा प्रेमाची कोणतीही भावना कळत नव्हती ,तेव्हापासून तू मला आवडतेस .
पण मधल्या चार वर्षात आपण संकोच्यामुळे एकमेकांशी बोलत नव्हतो. अबोल झालो होतो, तरी पण एकमेकाची खबरबात ठेवत होतो. जर तुझ्याही मनात तशाच भावना असतील,तर परवा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी, तू लाल ड्रेस घालून ये. तर मी समजेल की तुझेही माझ्यावर प्रेम आहे .
दोन दिवस तो आतुरतेने व्हॅलेंटाईन डे ची वाट पाहत होता. त्यादिवशी अक्षया कॉलेजमध्ये उशिरा आली, आणि ते पण निळा ड्रेस घालून आली ,त्याचे पुस्तक हातात दिले आणि पुढे निघून गेली.
विजय खूप निराश झाला, त्याला वाटले तिचे काही माझ्यावर प्रेम नाही. आणि म्हणून हिने माझे पुस्तक पण परत दिले .
विजय शेवटच्या निरोप समारंभाला देखील थांबला नाही ,आणि घरी निघून आला.
त्यानंतर तो दुसऱ्या कॉलेजला गेला ,पुढे शिक्षण, नोकरी, लग्न, सारे काही यथावकाश झाले.
लग्नानंतर ,दोन मुले झाल्यानंतर,
एकदा गणपतीच्या आधी पसारा आणि रद्दी काढून टाकावी म्हणून, बायकोने सगळे सामान बाहेर काढले होते.
त्यात लहान मुलांची खेळणी ,कपडे, रद्दीची पुस्तके, नको असणाऱ्या गोष्टी, असे सारे काही होते. विजय देखील तिच्याबरोबर सामानाचे सॉर्टिंग करत होता, आणि अचानक त्याच्या हातामध्ये "प्रेमा तुझा रंग कसा" हे पुस्तक आले. आणि त्याला सगळा मागचा किस्सा आठवला.
तेव्हापर्यंत न उघडलेले पुस्तक, आता त्याने बायको समोरच उघडले, आणि त्यातून सुकलेल्या लाल गुलाबाच्या पाकळ्या बाहेर पडल्या .
त्याबरोबर त्याने उत्सुकतेने पुस्तक उघडले ,तर आत एक चिठ्ठी देखील मिळाली.
प्रिय विजय, माझे देखील तुझ्यावर तितकेच प्रेम आहे. पण माझा लाल ड्रेस इस्त्री करताना जळला, त्यामुळे मी निळा ड्रेस घालून आले, त्यामुळे मला यायला उशीर झाला.
पण त्याच प्रेमाचे प्रतिक म्हणून, मी तुला या पुस्तकात घालून गुलाबाच्या पाकळ्या पाठवत आहे. आणि गंमत म्हणजे बायकोने ती चिठ्ठी हातातून ओढून घेतली,
त्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर सारे लाल लाल तरळू लागले दुसऱ्या दिवशी त्याची
पाठ लाल ,गाल लाल आणि ढुंगण देखील लालेलाल झाले.
त्याचा चाबूक लालेलाल त्याचा घोडा लाले लाल
असा आहे लाल रंगाचा महिमा
