ये तू प्रीतीत माझ्या
ये तू प्रीतीत माझ्या
तू.....तू म्हणजेच भावनांचं मोहोळ...! तू....तू म्हणजे शब्दचांदण्यांनी गुंफलेली माळ....! तू.....तू म्हणजेच भिजल्या मातीचा दरवळणारा गंध सुगधं...! तू....तू म्हणजेच पहाटेला साखरझोपेत पडलेलं गोड स्वप्न...! तू....तू म्हणजेच फक्त तू आणि तूच आहेस माझ्यासाठी....रूपाची खाण.... सौंदर्यवान...क्षणभर बघावं अन् बसावं आठवत तुला अशीच तू....टिमटीमती चांदणी. तुझा मंद स्मित प्रकाश दरवळत असतो कायम माझ्या मनांगणात... आणि प्रकाशमानच करतो बघ अवघा जीवन माझा. चैत्रात फुललेल्या....वसंतात बहरलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा सुद्धा सुगंध फिकाच असतो न तुझ्या मोहक सुगंधापुढे. तेवढा पांढरा शुभ्र चाफा...हतबलच होतो...बघून तुझ्या उमललेल्या ओठ पाकळ्या. हरवून जातो केवढा पण स्वतःला....तू त्याला केसांत मळतांना बघून. जाई जुई चमेली शरणच आलेत बघ.....झाले नतमस्तक तुझ्यापुढे...तुझ्या फुललेल्या तारुण्यापुढे. मग मी....मी.....कुठं...? उघड्या डोळ्यांनी बघावं तुला...नकळत नयनात साठवावं तुला....ते सौंदर्याचे मोहोळ पुन्हा पुन्हा डोळ्यांच्या पापणीवर आणून....मी पुन्हा पुन्हा आठवावं तुला....बस्स एवढंच....!!
उमललेली कळी तू
वसंताचा बहर तू
तू कलिका कोमलांगी
शीतल कौमुदी चांदणं तू
मग ये न एकदा प्रीतीच्या पैलतीरी....एकांतात कुठेतरी...नदीकिनारी...विशालकाय खडकावरी. घे मग हात माझा.... हातात तुझ्या...अन् रमून जा नकळत हृदयी माझ्या. बघ न तू जरा डोकावून...तुझ्याच हृदयी....दिसते का धूसरसी तरी माझी छाया. तुझ्या पाठमोऱ्या दर्पणात बघतो आहे मी माझेच....रूप...तुझ्यात गुंतलेले. न्याहळत आहे तुझ्या पाठमोऱ्या दर्पणात मी साठवून स्वतःला. वळून बघ ना मागे जारासी....तुझ्या पाठमोऱ्या सावलीत शोधत आहे मी...प्रकाशवाटा...प्रेमाळलेल्या. फुलू दे न जरा मला पण....प्रीतीच्या बागेत तुझ्या....चुंबून काढीन मी अंग नि अंग तुझं....रंगीबेरंगी फुलांनी सजून. कधी येईल मी फुलं बनून...ओंजळीत तुझ्या....अन् अलवार चुंबून काढीन बरं का लिपस्टिक भरले मृदुल कोमल ओठ तुझे....अन् सुगंध बनून दरवळेल तुझ्या मनांगणात. तर कधी घेईल मी विसावा क्षणभर...लांबसडक केसांत बसून तुझ्या.
भेट एकदा...काळोख्या रात्री....चांदण्यांच्या मंद प्रकाशात. येईल मी पण भेटण्या तुला....बनून काजवा इवलासा. लुप्त होतील चांदण्याही ढगाआड... बघून मला लुकलूकतांना. दाटलेल्या अंधारात...मग येईल मी तुझ्या पदरात अलगत.... मंद स्मिथ प्रकाश घेऊन. तर कधी येईल ओंजळीत तुझ्या... सामावून जाईल नकळत मग हृदयात जरासा. पकडशील न...! सांग ना...! रमून जाईल...ह...! तुझ्या मोहक सौंदर्यात मी. उजळून निघेल तुझं लावण्य... मी मात्र बसेल न्याहळत....माझ्याच प्रकाशात रूप तुझे. सर्वांगावर पसरेल तुझ्या माझंच मग.... प्रकाश सौम्य सौम्य. ये तू एकदाच फक्त....प्रीतवेड्या वाटेत या...चिंब भिजण्या प्रीतीत माझ्या. चिंब चिंब भिजवेल तुला....कोसळेल मी तुझ्याजसाठी....सरी बनून झिम्माड पावसाच्या. सुखावून जाशील तू...स्पर्शात माझ्या. अंग अंग चिंब भिजेल...हृदयी तुझ्या प्रीत रुजेल...पण ये तरी एकदा मिठीत माझ्या. थेंबाथेंबांनी घट्ट आवळेल मी चिंब भिजल्या हातांनी माझ्या....नखशिकांत माझंच स्पर्श....लाभेल तुला सहवास माझा. रंगून जाशील....दंगुण जाशील...प्रीतीत माझ्या. पण ये तू.....ये जराशी.... या प्रीतवेड्या मुक्तांगणी..! खेळच मांडू बरं का आपणही...कृष्णलीलयेत रमून बघू....राधेकृष्णापरी. मावळत्या सांजेला...नदीकिनारी....धुसरशा काळोखात भरवू न आपण पण रासलीला. साजरा करू चैत्र सोहळा.... तुझ्या माझ्या मिलनाचा. पण ये तू एकदा....हळूच....हृदयाच्या पायथ्याशी....मनाच्या प्रवाहात...फक्त आणि फक्त माझ्याचसाठी.

