जुन्याच त्या पायवाटा
जुन्याच त्या पायवाटा
आयुष्य बघा ना किती वळणं घेत पुढे पुढे जाते..जुन्यांना बाजूला सारत नाविण्यांचा शोध घेत..तरीही नव्यांना उराशी कवटाळायला गेलं तर..जुन्या आठवणी अलवार डोकावतात मनात..आणि मग राहून राहून वाटतेच जुनं ते सोनं...? सिमेंटचे जंगल कितीही सुंदर भासत असले तरी कशी येईल हो हिरवळीची सर...? देता येईल का त्यांना शुद्ध हवा आणि आक्सिजन...? अडवतील का ते वारे अन् देतील का पाऊस..? कृत्रिम सौंदर्यीकरणाची कितीही भुरळ पडली तरी शेवटी कृत्रिम ते कृत्रिमच..?
तशाच जुन्या पायवाटाही...! पावलांना अलवार आलिंगणच देत होत्या..पावले जायची समोर तरीही पाउलखुणांना मागे सारत पावलं आणि पायवाटांचे नातेच जपत होत्या त्या जणू...पायवाटेत पसरलेले वाळूचे ढीग म्हणजे पावलांसाठी मऊशार कापसाची पर्वणीच असायची..म्हणूनच थकत नसायची पावले कधीच..आणि थकत नसायचं देह पण...दुतर्फा वाढलेले गवत मनात हिरवळ पेरायचे ना..मग थकल तरी कसे..?
फूटभर रुंद असायची ती पायवाट तरी किती सुसाट धावायच्या हो सायकली..ना पडण्याचं भय ना अडण्याचं..आज वनवे..टुवे.. वरून भरधाव..सुसाट धावतांना असतो का हो निर्भय..? जीव मुठीत घेऊन पळावं लागते..जिथं तिथं ठेच पोहचण्याचीच भीती...कोण कधी ठोकेल काही पत्ता नाही...आणि मग अलवार डोकावतात मनात आठवणीतील जुन्याच पायवाटा..वळणं घेत जाणारी..नागमोडीच म्हणायचे ना हो आपण त्यांना...गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणीच बरं का...
आज रस्ते झाली मोठी..पायवाटांना दूर सारत..मिठमोठी वळणं घेत..बाजूला कृत्रिम प्राणी..ना हालिंग ना डुलिंग..ठेवलेल्या जागीच उभी ठाकलेली..ना खाता येत ना पिता येत..फक्त जाणाऱ्या येणाऱ्यांना दिसायचं एवढंच..तेही ठाऊक नसणार बिचाऱ्यांना...आधी मात्र पायवाटा असलेल्या जंगलात पशुपक्षांचा वावर म्हणजे प्रवाशांना सुखाची पर्वणीच असायची..मोफत सावली वाटणारी महाकाय वृक्षही मधून मधून प्रवाशांना छत द्यायची...आज गेट झालीत मोठमोठी प्रवासास शुभेच्छा द्यायला...बिनकामीच नाही का..? काहीतरी हरवत चालल्याचाच भास बरं का....
