पणती...तूच एक..!
पणती...तूच एक..!
तूच पणती
स्वतः जळती
मनामनात
दरवळती......
पणती एक नाजूक धागा...पणती एक स्वयंप्रकाश... पणती एक वलय तेजाचं... पणती एक विजयी पथाका काळोखाच्या माथ्यावर विराजमान झालेली...पणती एक ऊर्जा घराघरात दरवळणारी... आणि त्या पणतीसम तू...स्वतः जळून घरात प्रकाश पेरणारी...दुखऱ्या कळांना बाजूला सारत प्रकाश बनून दरवळणारी...तूच पणती एक सकारात्मकतेची किनार....
खरतर यात भारतीय संस्कृती पण तितकीच महान...म्हणूनच तुझी ही महानता टिकून असावी...तुझ्या हाताचा स्पर्श होण्या जणू त्या वातीही आसुसलेल्याच असाव्यात...तुझ्या नाजूक चेहऱ्यावरचे तेजोमय भाव जणू बळच देत असाव्यात वातींना म्हणूनच स्वतःभोवती काळोख ठेवून जळत असाव्यात त्या वातीही...तुझ्यासम..निर्भय...निरामय...निराकार...निःस्वार्थ...अगदीच मनोभावे...
तुझ्या नाजूक सौंदर्यात अजूनच भर घालायचं असावं त्यांना...तुझ्या नयनदर्पणात स्वतःच अस्तित्व बघायचं असावं त्यांना. त्यांना तरी कुठं ठाऊक...? तुझं शृंगार तर त्यांच्यासाठीच आहे...अनंत कळांना हृदयाच्या कोनाड्यात बंद करून ओठांवर हसू फुलवणे...हे तर तुम्हा वातीचंच देणं...वातींनाच समर्पित करीत असावीस तू....
घटकाभराचे आयुष्य तरी दुसऱ्यांसाठी जगण्यात घालवणं...आणि स्वतःच्या इच्छा आकांक्षांना कुचकरून नात्यांच्या अतूट बंधनांना निभावणं हे तुम्हा दोघींकडून शिकण्यासारखच...दोघीही जरी दिसायला नाजूक तरी मनानं बलशालीच म्हणावं...तुमच्या चेहऱ्यावरील तेजाचं वलय बघून बळच संचारते मनात...
देव्हाऱ्यात पेटत असलेल्या पणतीकडे जरी बघितलं ना तरी दरवळू लागते सुगंध तुझा...आणि मनातही अलवार पेटू लागतात वाती तुझ्या सहवासात ओलावलेल्या...तुझ्या नाजूक स्पर्शानी गंधलेल्या. जळूनही स्मित हास्य ओठांवर ठेवून पेटणारी वात आणि तू म्हणजे घरातील आनंदाचा दरवळच...ज्यांचं असणं जरी कळत नसला तरी नसणं मात्र हृदय हेलावून टाकेल हेही एवढंच खरं....
