नात्यांची वीण
नात्यांची वीण
नातं म्हटलं तर जगण्याचा खराखुरा आधारच...नात्यांशीवाय जीवनाचं गणित जुळवताच येत नाही...पण आज खरंच नाते हे बँकेतील खात्याप्रमाणेच झाले आहेत...जिथं फायदा तेच खाते चालवले जाते...पण नात्यांच्या बँकेत फायदा शोधणे किती महत्वाचे...? खरंतर या बँकेत समाधान शोधायला पाहिजे...प्रेमाची गुंतवणूक करायला पाहिजे...व्याजस्वरूपात मदत एकदिवस नक्कीच मिळवता येईल... मर्यादित जीवन सांभाळत एकच खातं सांभाळलं तर...शेवटी या खात्यात अश्रूही जमा नसतील अंतसमयी फुलं म्हणून वाहायला....
आजच्या पिढीत नात्यांची वीण अजूनच शैल होतांना दिसते आहे...नात्यांचे रेशिमबंध कच्चे धागे बनतांना दिसत आहेत...आणि मग काय...? तर घरातील लख्ख प्रकाशात सुखावर विर्जनच पडल्याचा भास...घरं बनू लागलीत महाल पण आनंदाचा गोंगाट हरवलेलाच...उच्च शिक्षणाच्या आभासात बुद्धी पुस्तकात बंदिस्त झाल्याचाच भास...कागदापत्रांच्या फाईलीत मात्र संस्काराचा अभाव...झाकोळलेल्या आकाशात चांदण्या दिसत नाहीत ना अगदी तसच झालंय बघा नात्यांचं...माणसांच्या गर्दीत आज नात्यांना अनुभवताच येत नाही...म्हणून तर आज आधार शोधायच्या वयात म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचं दार ठोठावावं लागते....
आधी नात्यांची वीण एवढी घट्ट होती की तिला शैल करण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी तरी ती घट्टच...कारण तेव्हा हे नाते विश्वासाच्या धाग्यांनी घट्ट बांधले गेले होते...आपलेपणाच्या आधारांनी ते सांधले गेले होते...म्हणूनच कुडामातीच्या छोट्याशा घरात सारवलेल्या भिंतीतून आनंदाचा झरा पाझरत होता...शेणाच्या सड्यात आपुलकीचा गंध अलवार दरवळत होता...आणि माणसांच्या गर्दीत पेरले जात होते संस्कार...शिक्षणाचा गर्व नव्हता अन् आशिक्षिततेची लाज...तेव्हा मात्र माणूस होता माणसात अन् गजबजलेला होता नात्यांचं गाव...
चंद्र जावं ढगाआड...चांदण्याही व्हाव्या लुप्त नभांगणात...आणि या सर्वांच्या उपस्थितीत पसरावा सर्वत्र अंधकार हेच घडतेय आज...माणसांच्या गर्दीत शिल्लक राहिली नाही माणुसकी...नात्यांच्या गर्दीत दिसत नाही आपलं म्हणावं असं एखादं नातं... फुलांच्या गर्दीत हरवून बसलाय सुगंधाचा दरवळ...दिसते फक्त घरांच्या गर्दीत पोरका झालेला माणूस दिव्यांच्या लख्ख प्रकाशात संस्कार शोधतांना...नात्यांच्या डायरीत फायदा शोधतांना...प्रगतीच्या शिखरावर एकटाच चढतांना...स्वप्नांनी भरलेली आयुष्याची झोळी मात्र नात्यांशीवाय रितीच...!
