रात्र यौवनातील
रात्र यौवनातील
आपले कार्य पार पाडून दिनकर माघारी फिरलेला...यामिनीसाठी विविधरंगी अंथरूनच हातरत होता जणू तो. हसत हसतच चालला होता...यौवनातील रातीला बघून. दिवसभर थकुन भागून स्मित हास्य पेरत जाणे जमत नाहीच सर्वांना...! ही दिनकराची दिनचर्याच निराळी...उगवतोही हसत हसत...आणि मावळतो पण हसत हसत. सुवर्ण रंगांची उधळण करत येणारा दिनकर....सकल सृष्टीला पहाट झाल्याची हाकच देत असतो....आणि जाता जाता पुन्हा रंगीबेरंगी शालू धरेला भेटच देऊन जातो. सावळ्या रंगातील धरेचं सौंदर्य क्षणातच दिसेनासा होतो....बसताच अंथरून पायघड्या....ती रात काळोखी. धरेच्या प्राक्तनात कोसळूच लागतात मग....फुले चांदण्यांची....भासावित जणू ती प्राजक्ताची. काळोखच घेऊन येते ही रात....यौवनातील..! कुणी बघतील याच भीतीनी असणार कदाचित...? हिचं काळोखातच येणं. जराशी मदहोश....जरा नशिली...काळोखातही दिसावं...ओठ रशीली...अशीच असते ही वेडावलेली काळोखी रात्र वेडी. वेडच लावते...कधी चांदण्यांना...तर कधी चांदव्याला...तर कधी रातराणीसवे टिमटीमत्या त्या काजव्यांना. यौवनभरल्या रुपात तिच्या मोहूनच जाते ती रातराणी....आणि दरवळू लागतो मग गंध तिचा...काळोख्या रातीच्या मनांगणी.
सडा सांडतो चांदण्यांचा....अंथरलेल्या तिच्या पदरावरती...अन् काळ्या सावळ्या रुपावरती. अजूनच उजळू लागते रात्र ही चांदण्यांच्या मंद मंद सौम्य प्रकाशात...जणू सामावूनच जाते ती मग चांदण्यांच्या चांदण मोहात. या चांदण्यांचं मोहोळ सुद्धा या रात्रीसाठीच सजलेला...प्रेमातच पडलं असावं काळ्या सावळ्या रजणीच्या. त्या मद्यधुंद हवेच्या लहरी...अजूनच छेडत असाव्यात तिला...! मला मात्र फक्त आभास. ही गुलाबी हवा.....वेड लावी जीवा...जणू वेडच लावत होती यौवनातील रातीला. रात्र अजूनच फुलतांना दिसत होती....रातराणीसवे झुलतांनाच दिसत होती...रातरणीच्या फुलांना कोमल मृदुल ओठांनी चुंबतानाच दिसत होती. काजवे मात्र प्रेमातच पडली असावीत काळोखातील रातीच्या...आरास मांडली हृदयी तिच्या. यौवनाच्या शालूवर काजव्यांची फुले...चांदणभरल्या आकाशी...चांदव्याची झुले. चांदव्याचा झुल्यावर स्वार झालेली काळोखी रात...घेऊ लागली झोके उंच उंच..आकाशी...जाऊन बसू लागली ढगांच्या पायथ्याशी. भिजू लागली चिंब चिंब गारव्याच्या गारठ्यात...नाचू लागली धुंद बेधुंद रातकिड्यांच्या सुमधुर गीतात. चांदण्याही खेळू लागल्या लपंडाव आकाशी...चांदव्याचा सौम्य प्रकाशी. काजवेही बसली हरवून स्वतःला....रातीच्या मोहात...तिच्या यौवनाच्या डोहात...मी मात्र तिच्याच आठवणींच्या मोहात.
मोहरली रात्र...बहरल्या चांदण्याही...नभांगणात आणि मनांगणात माझ्या. निरभ्र आकाशात...मी मात्र तिच्याच शोधात...हरवून बसलो स्वतःला चित्रविचित्र सावल्यांचा मोहात. काजव्यांचा रानात....चांदण्यांच्या बनात...हरवतच चालली होती अंधार आपला.... ती यौवनातील रात्र काळोखी. माझ्या मनांगणात मात्र अजूनच दाटू लागला होता...अंधार काळोख्या रातीचा...अन् तिच्या आठवांच्या गाठींचा. आठवांचे मोहोळ अजूनच साठत होते मनात माझ्या....प्रीतभरल्या रानात माझ्या....कोसळू लागला क्षणातच प्रीत पाऊस...प्राक्तनात माझ्या. भिजू लागलो चिंब चिंब मी...मध्यरात्री...गोड स्वप्नात तिच्या. रात्र जसजशी गारठ्यात गारठू लागली...तसतसा मी पण तिच्या मिठीत गारठलेलाच. रातकिड्यांच्या किर्रर्रर्र आवाजात सजलेली रात्र....जणू चोरपावलांनी उजडायलाच निघालेली. चांदण्यांचं मोहोळ लुप्तच होऊ लागलेला..ढगाआड नभांगणी. मी मात्र पहुडलेलाच उबदार तिच्या घट्ट मिठीत. लपली होती काजवेही...अन् रुसली होती रातराणी. पसरू लागला प्रकाश पुन्हा...पिऊ लागला दवबिंदू...स्वप्नातून जागवण्या मला नकळत दिनकर आला धावून. थोडासा बवरलो मी....अन् सावरलो स्वतःला...दूर सारून मोह रातीचा....केलो प्रणाम पहाटेला. अशीच होती ती रात्र...यौवनातील....आणि 'ती' माझ्या स्वप्नातील.

