STORYMIRROR

Sattu Bhandekar

Others

2  

Sattu Bhandekar

Others

पुस्तकांचं गाव

पुस्तकांचं गाव

2 mins
127

       असावं एक आपल्याही जगात पुस्तकांचं गाव...शब्दांनी सजलेला...भावनांनी भरलेला. आपल्यालाही असावी एक ओढ अनामिक त्या गावाची. प्रकाशला असावा गाव तो चांदणं पेरणीन. शब्दचांदण्यांच्या मोहानी थांबावं आपण क्षणभर...अन् वाचावं गाव ते पुस्तकाचं. भावनांच्या ओलाव्यात रमून जावं....भिजून जावं...गुंताव पुस्तकात घटकाभर. साहित्याच्या जगातील हा रमणीय सफर....जरी काल्पनिक असला तरी...हवाहवासाच वाटतो न अगदी. पुस्तकांच्या गावातील मन कधी होतो भावनिक....कधी भावविवश...मात्र मनसोक्त सैर करू लागतो कल्पनेच्या काठावर. कधी रमतो तो कवितांच्या कवितेत...अन् कवितांच्या कल्पनेत...तर कधी त्या कविता नकळत घेऊन जातात त्याला तारुण्याच्या काठी. कधी अगदी मुक्त विहारतो मग आपल्याच जगात हा मन अगदीच कवितेतील मुक्तछंदापरी. कधी होतो मग स्वरबद्ध तर कधी वृत्तबद्ध....अन् नाचू लागतो थयथय गझलेच्या तालावर.


      पुस्तकांचं गाव खरंच जगायलाच शिकविते जीवन....अन् वाचायला शिकविते पुस्तकांसोबत माणसं पण. मन प्रगल्भच होतो आणि विचार सुद्धा...आत्मसात करून थोर व्यक्तींचे विचार. श्रीमंती वाढतच जाते विचारांची आणि शब्दांची पण. पुस्तकांच्या गावात शब्दांना उधानच आलेले असते. तिथला आपला रमणीय सफर म्हणजे पेरणीच असते शब्दांची...पुस्तकातील माणसानं आपल्यात केलेली. हा प्रतिभासंपन्न गाव नकळत आपल्याला घेऊनच जात असतो न....आपल्या पण जुन्या आठवणींत. या गावातील प्रत्येक वाट ही आपल्या मनाशीच जुळलेली असते. म्हणूनच तो गाव आपल्या शब्दांच्या मोहजालात आपल्याला नकळत अडकवत असते. तेथील प्रेयसीला बघून आपलं मन आपल्याच प्रेयसीच्या भावविश्वात वाटचाल करू लागतो....अन् सुरू होतो मग आपला आठवणींच्या जगातील रमणीय सफर.


     या पुस्तकांच्या गावात सैर करणे म्हणजे....बीजांना अंकुरण्यासाठी पावसानी धो धो कोसळावं असंच काहीसं. आणि साहित्याच्या वावरात मग अलवार अंकुर येऊ लागतो शब्दांना. अंकुरलेले शब्द पुन्हा पुन्हा पेरण्यास सज्ज....अजून नव्याने अंकुरण्या. असंच बहरत जातो मग शेत शब्दांच्या हिरवळीने. झुलू लागतो...फुलू लागतो....बहरू लागतो मग हे गाव साहित्याचे. पुस्तकांच्या गावात शब्दांशी झालेली मैत्री म्हणजे एक अविस्मरणीय ठेवाच. हा अलवार मनातल्यामनात आनंदाच्या रिमझिम सरीच घेऊन येतो. या शब्दांच्या सरीत चिंब भिजतांना मनाला एक नवआल्हादच मिळतो.


       पुस्तकांच्या गावातील साहित्याचा मळा फुलतांना मन भरवूनच येतो आनंदानी. कधी स्वतःची आत्मकथा सांगतात ही पुस्तकं...तर कधी....जाऊन बसतात कल्पनेच्या पैलतीरी. कधी वसतात ती कादंबरीच्या कोंदणात तर कधी....बसतात कथेच्या खांद्यावर. काही पुस्तक मात्र जीवनाच्या वाटेवर लालित्यच पेरतात बरं का. पुस्तकांच्या गावात ही पुस्तकं लालित्याची लालित्यमय झुलच पांघरून असतात. हेच लालित्य मग आयुष्य ललीतमय करायला नकळत मदतच करतात. या पुस्तकांच्या गावातील सफर म्हणजे जीवनाला मिळणारी एक कलाटनीच असते...त्यातल्यात्यात शब्दांच्या गुंत्यात गुंतत गेलेले मन म्हणजे शब्दांच्या जगातील एक मुक्त विहारचं बरं का. हेच एक गाव पुस्तकांचं....माझ्या मनातील....अन् स्वप्नातील पण. पुस्तकांच्या गावात....शब्दांशी सोयरीक....क्या बात है...! 


Rate this content
Log in