मन चिंब पावसाळी
मन चिंब पावसाळी
वर्षा ऋतूचे आगमन...मृगाच्या रिमझिम सरी... थेंब थेंब पावसाचा जणू कोसळतानाच दिसते...आसुसलेल्या मनावरी. ढगांचा नृत्यतांडाव...मद्यधुंद वायू लहरी...विजांचा झगमगाट बघून मन भासते चिंब पावसाळी. हा अनोखा ऋतुसोहळाच म्हणावं लागेल...वेड लावी जिवा...हाच भास. ढगांचा मळभ पूर्ववत होत नाही.... तोवर...आठवांच्या सरींनी जोर धरावा...कोकिळेचा स्वर मनात अलवार घर करावा...पावसाळलेल्या सृष्टीत...दृष्टीस पडावी ती...आणि क्षणातच रिमझिम पाऊस...धो धो कोसळू लागावा...खरंच वर्षा ऋतूचा वर्षाव म्हणजे फुलांची बरसातच तर नाहीना...! हिरव्या हिरव्या पर्णावरी...भासावित थेंब मोतीयापरी...मुक्त विहारावे खग नभात...मी मात्र हरवलेलाच...दाटलेल्या आठवांच्या ढगात. धो धो कोसळणारा पाऊस आणि आठवांच्या रिमझिम सरी...आज बघायचंय मला...कोण कोसळणार जास्त ते.
राहून राहून कोसळणारा पाऊस...अजूनच धो धो कोसळू लागलेला...जागवतच होता...कळत नकळत आठवांना माझ्या...आणि काहूरच माजवू लागल्या त्या वादळ बनून...चिंब भिजतांना तिला बघून...मी मात्र कोरडाच...चिंब भिजले मन तरीही. तिची एकेक अदा डोळ्यात साठत होती...तसतशी पावसाची गतीही मंदावत होती...ती मात्र देत होती साद पावसाला... अन् माझ्याही आठवांना. भिजवत होता पाऊस तिला...पण भिजत होती ती आठवांत माझ्या...मी न कोसळताच...तेव्हा मात्र पावसाने रान मांडले...माझ्याही आठवांचे बांध फुटले... जणू स्पर्धाच सुरू झाली होती....पाऊस आणि आठवांची.
चिंब भिजली ती...आणि अंग अंग तिचे...थेंब थेंब सजू लागले...मोती बनून वसू लागले...ती मात्र हसू लागली...बघून मंदावलेल्या पावसाला... जणू म्हणतच होती त्याला...तूझें कोसळणे एक बहानाच...भिजली तर आधीच होती मी...आठवांच्या रिमझिम सरीत. बघ तो कोरडाच उरला...भिजवून चिंब मला...आपल्या आठवांच्या सरीत. जिंकला तो...बघ अजूनही ठाण मांडून बसलेत...त्याच्या आठवांचे ढग...जरासा का कोसळलास...आणि झालास तू पसार...बस्स...एवढंच का कोसळणं तुझं...!
तेव्हा मात्र पावसाने डोळे मोठे करून बघू लागले...माझ्या कोरड्या अंगाकडे...कसे दिसणार त्याला माझे मन चिंब पावसाळलेले...? वरून कोरडा असलेला मी मात्र चिंब भिजलो होतो आठवांत तिच्या...आणि भिजत होती ती आठवांत माझ्या...पाऊस मात्र हरलेलाच...मात्र मान्य नसावी हार त्याला...आणि ओरडू लागला ढगाआड जाऊन...येऊ लागला अग्निअस्त्र घेऊन...पण तीही तेवढीच धीट...नाचू लागली...गाऊ लागली...भयभीत न होता...बघून त्याला. रुसलेलाच दिसत होता पाऊस जरा...बघून तिला...प्रीत सरीत पावसाळलेलं...आठवांत माझ्या वेडावलेलं...तिचा हात बघून हातात माझ्या.
मने चिंब पावसाळलेली...प्रीत सरीत वेडावलेली...बघून पुन्हा कोसळू लागला...चिंब आम्हा भिजवू लागला. सुखावलाच होता बघून तिला मिठीत माझ्या. सैरभैर कोसळू लागला...वाऱ्याच्या लहरिसवे... आवडलं होतं कदाचित त्याला...तिचं माझ्यात गुरफटने...अजून घट्ट पकडणे...कोसळता कोसळता हसू लागला...बोलू लागला आम्हास तो...लगे रहो... मै तुम्हारे साथ हू. आणि भिजू लागला तोही चिंब...बघून आमचे प्रतिबिंब. हरलेला पाऊस जिंकलाच अखेर...देऊनी साद आम्हास.

