झिम्माड पाऊस
झिम्माड पाऊस
भेट तिची नि माझी...अजूनही आठवते...आणि मग आठवतात ते क्षण...त्या झिम्माड पावसातील. सूर्य आग ओकू लागलेला.... धराही तहानेनी व्याकुळ. उष्णतेच्या झळा तर असह्य झालेल्या....अन् कोसळत होत्या धारा अंगातून घामाच्या....अन् करीत होत्या चिंब चिंब अंगाला. वाऱ्याच्या झुळुका तर वार करायलाच निघालेल्या....आम्ही मात्र शोधू लागलो सावली... उन्हात त्या रखरखत्या. मृग नक्षत्र नुकताच लागलेला....मात्र लपून बसलेल्या पावसात....सूर्याची प्रखरता अजूनच चटके देत होती. आम्ही मात्र सावली शोधून झाडाच्या आडोश्याला निवांत बसलेलो. थकलेलाच होता देह आमचं काहीसा...फिरून फिरून जीवघेण्या उन्हात त्या. ती प्रखरतेची चादर मात्र अवणीला नकोनकोशीच झालेली...होरपळतच होती आतल्या आत ती. आम्ही मात्र सुखावलो जरा...त्या हिरव्यागार वृक्षाच्या छायेखाली. तो वृक्ष मात्र स्वतः त्या असह्य झळा सहन करून आमच्यावर सावलीची पांघरून पसरलेला बघून...त्या वृक्षाबद्दल विचारच करू लागलो. कृतघ्न झालो बरं का आम्ही.
वृक्षाच्या छायेखाली विसावलो दोघेही....अन् रमू लागलो मग गप्पांत आम्ही. शोधू लागलो एकमेकांस....भिडवून नायनांना नयन आम्ही. टिपू लागलेत नयन मग भाव नयनांतील....अन् हे सर्व बघूनच की काय ओसरू लागली ती असह्य उन्ह. एवढ्या प्रखरतेत पण तिच्या ओठांवरील फुललेली लाली....जराही कोमेजली नव्हती. घामाच्या धारांतही तिच्या चेहऱ्यावरील तेज जराही विस्कटलेले दिसत नव्हते. भिजलेले अंग अजूनच मोहक दिसू लागलेले.... मला बघूनच की काय...? तिचे कुरळे केस मात्र झोकेच घेऊ लागले....वाऱ्याच्या लहरिसोबत. ती पण झुलू लागलेली माझ्या शब्दांच्या झुल्यावर...तो झुला तिला उंचच उंच घेऊन जाऊ लागलेला....अन् सफर करू लागली ती....उंच नभांगणी...! तिच्या मृदुल कोमल ओठांवर प्रीतीच्या झळा नकळत पसरू लागलेल्या....अन् कोसळू लागल्या मनांगणी तिच्या...प्रीतीच्या झिम्माड सरी. नकळत भिजतच होती ती आतल्याआत...अन् तिच्याच सोबत मी पण. आकाशात मात्र ढगांचा वावर सुरू झालेला...आग ओकणारा सूर्य लुप्तच झाला होता ढगाआड त्या...बघवलं नसेल त्याला आमचं हे मनातल्यामनात भिजणं कदाचित. दिवस पण मावळतीलाच आला होता. क्षणातच काळोख दाटू लागला....स्वागताला वाऱ्यांच्या लहरी पण वाहू लागलेल्या. क्षणातच निरभ्र आकाशात ढग नाचू लागलेली....आम्ही मात्र एकमेकांत रममाण धुंद बेधुंद...फक्त गप्पांतच बरं का...!
विजांचा तांडव सुरू झालेला....वाजू लागले ढोल आकाशी. आसुसलेली धराही स्वागतास सज्जच झालेली. उन्हाच्या असह्य झळा सोसलेली वृक्ष पण गितच गाऊ लागलेले...आनंदात विहारच करू लागले ते पण. तहानेनी व्याकुळ धरेला....मोहनीच पडली...काही क्षणात कोसळणाऱ्या पावसाची. आकाशात दिवेच लागलेले भासत होते बरं का....दामिनींचे नृत्य बघून. आम्हीही थोडं भानावर आलेलो...तो तांडव बघून. मध्येच एक आवाज झाला... कर्णकर्कश... आणि तो म्हणजे.....पाऊस कोसळणार हेच सांगायला आलेला. ती मात्र त्याच क्षणी घट्ट पकडली मला. त्या विजेच कडाडणं म्हणजे तिचं माझ्यात अजूनच गुंतणं... आवडलं पण मला. अन् सुरू झालं क्षणातच खेळ पावसाचा अन् आमचं पण. भिजू लागली धरा चिंब चिंब....अन् आम्ही पण. दरवळू लागला सुगंध मातीचा...अन् आमच्याही प्रीतीचा पण. धरा पावसाशी एकरूप झालेली....ती मात्र माझ्यात. अबोली रंगाची साडी घातलेली ती....अबोलच झाली जरासी. भिजलेल्या वस्त्रात अजूनच मादक दिसत होती ती...अन् अंग नि अंग तिचे. मिठी सैल होताच बेधुंद भिजू लागली ती....त्या झिम्माड पावसात.
पावसाच्या थेंबाथेंबानी स्पर्शू लागले अंग नि अंग तिचे....भिजलेल्या केसांच्या बटा अजूनच खुलून दिसू लागल्या. तिचे पावसात भिजणे म्हणजे....तिच्या सौंदर्याला आलेला पुरच होता. तिने मला पण ओढले झाडाखालून....अन् भिजू लागलो चिंब दोघेही आम्ही. तिच्या ओठांवर पसरलेले पावसाचे थेंब टिपू लागले मग ओठ माझे. छेडू लागल्या त्या केचांच्या बटा तिच्या...चिंब भिजलेल्या अंगाला माझ्या. झिम्माड पाऊस अजूनच जोर धरलेला....धो धो पावसात ती अन् मी...कोसळत होता मग हाच पाऊस मनांगणात तिचा आणि माझ्या पण. टिपू लागले अधर तिचे...थेंब अन् थेंब अंगावरील माझ्या....टिपू लागले अधर माझे पण भिजलेल्या अंगावरील पावसाचे थेंब तिच्या. टिपू लागला पाऊस पण अंग भिजल्या धरेचे...काढू लागला भरूनच भेगाळलेले ओठ तिचे. तहानेनी व्याकुळ धरा चिंब झाली प्रीतीत त्याच्या....अन् झिम्माड मिठीत पण.
पाऊस ओसरू लागला....अन् झाला विराजमान सूर्य पुन्हा. धरा पूर्णतः सुखावलेलीच दिसत होती...अन् ती पण. प्रीतीचं रंग ओसंडून वाहत होता.... चिंब भिजल्या धरेवर. आणि चिंब भिजल्या तिच्या ओठांवर अन् अबोली रूपावर पण. प्रीतसुखात सुखावलेली ती...हसू लागली बघून मला. तिचं हे मंद स्मित हास्य म्हणजे.... माझ्यासाठी एक अनमोल नजाराच होता...आणि एक अनमोल भेट पण. एक अविस्मरणीय ठेवाच बरं का हा झिम्माड पाऊस....धरेसाठी आणि माझ्यासाठी पण.
