Gauspasha Shaikh

Drama Fantasy

3  

Gauspasha Shaikh

Drama Fantasy

वली सिफ़त

वली सिफ़त

11 mins
171


 मी साधारण आठ वर्षांचा असेन तेंव्हा.आजही मला स्पष्टपणे आठवते.संध्याकाळ व्हायची वेळ झालेली होती.हवेत हलकासा गारवा जाणवत होता.अब्बांनी लुना घराबाहेर काढली आणि दोन्ही हातांनी हॅन्डल पकडत धावत सुटले.थोडेसे पुढे गेल्यावर लुना चालू झाल्याचा आवाज आला.अब्बा उडी मारून सीटवर बसले.मग मी धावत गेलो आणि अब्बांच्या हाताखालून वाकत लुनाच्या हॅन्डल आणि सीटमध्ये जी मोकळी जागा असते तिथे जाऊन उभा राहिलो.लुना सुरु करायची माझ्या अब्बांची ती नॉर्मल पद्धती होती.शहराच्या मुख्य चौकातील पुतळ्याला वळसा घालून बडा कब्रिस्तानच्या रोडने आमची लुना धावत होती.मी टायरखालून मागे धावत जाणाऱ्या रस्त्याकडे पाहत अधून मधून उगाच हॉर्न वाजवत होतो.दहा पंधरा मिनिटांनी आम्ही बस स्टॅन्डवर पोहोचलो तर आजोबा आधीच तेथे पोहोचलेले होते.ते गावाकडून आलेले होते.चेहऱ्यावर पांढरी शुभ्र लांब दाढी, डोक्यावर गोल जाळीदार टोपी,अंगात मळकट पांढरट रंगाचा लांब कुर्ता व पायजामा,पायात कातडी चप्पल आणि काखेत कापडात गुंडाळलेली हार्मोनियम असा त्यांचा एकंदरीत पेहराव होता. दद्दु ....अशी हाक मारत मी धावतच त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या कंबरेला माझ्या हातांनी वेढा देऊन त्यांना बिलगलो.अरे मेरा बापू..तू भी आया?म्हणत त्यांनी माझ्या केसांवरून हात फिरवला.

        मागच्या महिन्यात आजींचे निधन झाले होते त्यावेळी आम्ही सगळे आमच्या मूळ गावी म्हणजे सांगवीला गेलो होतो.दफनविधी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे जियारतसाठी कब्रिस्तानला जाऊन आलेले होते. बरीच नातेवाईक मंडळी कालच निघून गेली होती.आज फक्त मोजकी लोकं होती.माझी अम्मी आणि चाची चहाची तयारी करत चुलीजवळ घुटमळत होत्या.अंगणातील लिंबाच्या झाडाखाली भली मोठी जाडजूड सतरंजी टाकलेली होती.तिथे अब्बा,चाचा आणि माझ्या दोन आत्या आजोबांच्या गोलाकार बसून हळुवार शब्दांत काहीतरी बोलत होते.आजोबांचे कान तर त्यांच्याकडे होते पण डोळे वर आकाशात! मी चहा घेऊन आजोबांकडे गेलो तेंव्हा कळले हे सर्वजण त्यांना गाव सोडण्यासाठी विणवत होते. मात्र आजोबा नेहमीप्रमाणेच गावातील घर सोडून येण्यासाठी तयार होत नव्हते.गावाच्या मातीत त्यांचे पाय घट्ट रोवलेले होते.माझी काळजी घ्यायला माझा गाव समर्थ आहे,ते मला कधी उपाशी ठेवणार नाही,असेच सर्वांना ते समजावत होते.त्यामुळे सगळे चिंताक्रांत होते.पण अब्बांनी हट्टच धरला.मोठ्या अत्यांनीही जोर दिल्यावर शेवटी आजोबांनी आजमपूरला आमच्याकडे यायचं मान्य केलं होतं.परंतु महिन्याभरात मी स्वतः लियाकतकडे,म्हणजे माझ्या अब्बांकडे येईन असं ते म्हणाले होते.त्यामुळे आम्ही सगळे निघून आलो होतो.दिलेल्या शब्दाला अनुसरून आजोबा आज आमच्या घरी राहायला आलेले होते.

         आजोबांना घेऊन आम्ही घराकडे निघालो.बस स्टॅन्डकडे जाताना सुमसान वाटणाऱ्या बडा कब्रिस्तान जवळ परत येताना मात्र खूपच गर्दी दिसत होती. अगदी रोडवर सुद्धा काहीतरी चर्चा करत लोकं गटागटात उभी होती.ऑटो,बाईक आणि सायकल अशी वाहने रोडच्या कडेला लावून लोकं कब्रिस्तानच्या भल्यामोठ्या गेटमधून घाईघाईने आत जात होती. गर्दीतून वाट काढत लुना चालवताना अब्बांची दमछाक होत होती.त्यात उजव्या मांडीवर आजोबांनी धरलेला हार्मोनियम अडचणीत भरच टाकत होता.अब्बांना गर्दीचे आश्चर्य वाटत होते.ते खूप वेळा दफनविधीसाठी आले असतील पण इतकी गर्दी त्यांनी कधीच पाहिलेली नव्हती,असे ते आजोबांना सांगत होते.कोणीतरी बडा आदमी स्वर्गवासी झाला असेल असा अंदाज दोघांनी बांधला होता.दफनविधीला हजेरी लावल्यामुळे सवाब मिळतो म्हणत कब्रिस्तानपुढील वाहनांच्या गदारोळात अब्बांनी पण त्यांची लुना लावली आणि आम्ही तिघे कब्रिस्तानमध्ये गेलो.एका कबरीभोवती खूप गर्दी झालेली होती.सगळे अल्लाहु अकबर,अल्लाहु अकबर असे पुटपुटत होते आणि हात वर करून दुआ करत होते.आम्ही त्या कबरीभोवती गोलाकार थांबलेल्या गर्दीत शिरण्याचा मानस करतच होतो इतक्यात रशीद भाई त्या गर्दीतून बाहेर पडताना दिसले.बाबांच्या फळविक्रीच्या गाड्याजवळच त्यांचे छोटेसे गॅरेज होते. अब्बांनी त्यांना ईशाऱ्याने जवळ बोलावले आणि विचारले,

" कोणाचा इंतकाल झालेला आहे रशीद भाई ?"

" कुणाचाच नाही.." रशीद भाईने धक्काच दिला.

" मग एवढी गर्दी कशासाठी जमलीय ?" अब्बांनी उत्सुकतापूर्वक विचारणा केली.

" कब्रिस्तानची मरम्मत करण्यासाठी खोदकाम करत असताना मजुरांना एक मृतदेह सापडला आहे त्याचा दीदार करण्यासाठी लोकं गर्दी करत आहेत"रशीद भाई म्हणाले.

"कब्रिस्तानमध्ये खोदकाम करत असताना एखादा मृतदेह सापडला तर त्यात एवढे काय आश्चर्य ?" आजोबांनी प्रश्न केला.

"तो मृतदेह कादिर भाईंचा आहे.दोन वर्षापूर्वी नमाज अदा करत असताना हार्ट अटॅकने मशिदीमध्येच कादिरभाईंचा मृत्यू झाला होता.दफन करून दोन वर्ष झालेले असतानाही त्यांच्या मृतदेहाचे विघटन झालेले नाही.त्यांच्या कफनला साधा डाग सुद्धा लागलेला नाही.अल्लाहने त्यांच्या नेकीचा त्यांना मोबदला देत त्यांचा सम्मान केला आहे असेच लोकांना वाटते आहे,म्हणून त्या वली सिफत माणसाचा दीदार करण्यासाठी लोकं गर्दी करत आहेत"

रशीद भाई अगदी भारावून गेल्यासारखे बोलत होते.

 "अल्लाह निश्चितच वली सिफत लोकांचा उचित सन्मान करतो आणि त्यांना जन्नतमध्ये स्थान देतो " अब्बांनी दोन्ही हात वर करत म्हटले.

" चल आपणही दीदार करू या " आजोबांनी काखेतील हार्मोनियम सरळ करत म्हटले.

अब्बांनी मला खांद्यावर घेतलं आणि आजोबांचा एक हात पकडत ते कबरीजवळच्या गर्दीत शिरले.अब्बांच्या खांद्यावरून मी अगदी स्पष्टपणे पाहू शकत होतो.एक तेजस्वी चेहऱ्याची व्यक्ती पांढरा शुभ्र कापड गुंडाळून शांतपणे झोपली आहे असेच भासत होते.एवढ्या गर्दी आणि गोंगाटातही त्या नुरानी चेहऱ्याकडे पाहून निस्सीम शांतीचा अनुभव होत होता.दीदार केल्यानंतर आम्ही घराकडे निघालो तेंव्हा माझ्या डोक्यात एकच शब्द घोळत होता,वली सिफत..!

  

         कब्रिस्तानवर बराच वेळ गेल्यामुळे घरी जायला आम्हाला उशीर झाला होता.घरी पोहोचताच अम्मीने आजोबांना सलाम केला.आजोबांनी गळ्यातील हार्मोनियम काढून अम्मीच्या पायाजवळ ठेवली.हार्मोनियम पाहताच अम्मीचा सूर आणि नूर बदलल्याचे माझ्या लक्षात आले होते.झटक्याने मागे वळत अब्बांच्या कानाजवळ काहीतरी पुटपुटत ती घरात गेली.अम्मीने जेवण बनवूनच ठेवले होते.जेवण झाल्यावर आजोबा झोपायला छतावर गेले तेंव्हा अम्मी अब्बांना खालच्या सुरात म्हणाली,

"ही अवदसा सोबत घेऊनच आले ना शेवटी? मी तुम्हाला त्या वेळीच बजावत होते कि त्यांना साफ़ साफ़ सांगूनच इकडे यायचा आग्रह करा म्हणून,पण तुम्ही माझं कशाला ऐकाल ?"

  

"अग, सगळी जिंदगी त्यांनी हार्मोनियमच्या सानिध्यात घालविली आहे.मग असं अचानकच कसं..? अब्बांचं बोलणं अर्धवटच राहिलं.आई रागातच निघून गेली.

           अब्बा आणि मी आजोबांजवळ झोपायला छतावर गेलो.खूप दिवसानंतर आजोबांच्या कुशीत झोपून चांदण्या न्याहाळत होतो.गावाकडे गेल्यावर मी आजोबांसोबतच अंगणात झोपायचो.आपली खाट म्हणजे पाळणा आहे आणि आभाळातील चांदण्या म्हणजे पाळण्याला लावलेली गोल झालर आहे असे आजोबा म्हणायचे,तेंव्हा आजोबा आणि मी तान्हुले मुलं असल्याचाच भास मला व्हायचा.

 " दद्दु वली सिफत म्हणजे काय हो ? " बऱ्याच वेळापासून डोक्यात घोंगावणारा प्रश्न मी त्यांना विचारला.

" वली सिफत म्हणजे संत महात्म्याचे गुण अंगी असणारा माणूस, सामान्यातला असामान्य माणूस,नेक माणूस अशी माणसे अल्लाहला खूप आवडतात.अल्लाह त्यांच्या मृत्यूचाही उत्सव करून टाकतो आणि त्यांना सन्मान प्रदान करतो" आजोबांनी आकाशातील चांदण्या न्याहाळत म्हटले.

कबरीस्तानात आज पाहिलेल्या वली सिफत व्यक्तीविषयी माझ्या मनात अभिमान दाटून आला होता.चांदण्या न्याहाळत कधी मला झोप लागली ते कळलेच नाही.

         आमचे घर जामा मशिदीला खेटूनच होते.मशिदीच्या डाव्या भिंतीला लागून एक पॉश चाळ होती.चाळ एवढयासाठीच म्हणायचे की एकानंतर एक अशा ओळीने अनेक घरांची एक रांग होती पण उत्तम बांधकाम केलेली प्रशस्त घरे होती तिथे. त्या चाळीमध्येच आम्ही राहायचो.मुळात आमची चाळ मशिदीचीच प्रॉपर्टी होती.तिथे आमच्यासारख्या गरजू लोकांना कमी भाड्याने चांगले घर मिळायचे.मशिदीच्या कमिटीला ही घरे भाड्याने द्यायचा अधिकार होता.त्यांचे नियम फार कठोर होते.त्या घरांमध्ये टीव्ही,रेडिओ वगैरे अलाऊड नव्हते.तरीपण या चाळीत घर मिळावे यासाठी खूप लोकं प्रयत्न करायची.माझ्या अब्बूचे जीवन धार्मिक,नैतिक तत्वांना अनुसरून होते म्हणून त्यांना ह्या चाळीत घर मिळाले होते.माझ्या अम्मीला हे घर फार आवडायचे.तिथे पाणी,वीज अशा सगळ्या सुविधा व्यवस्थित होत्या.येथील घरे एकदम पॉश आणि पुरेशी जागा असलेली,हवेशीर आणि स्वच्छ असलेली होती शिवाय भाडे अगदी नगण्य होते.भाडे वेळेवरच भरायची कटकट नव्हती.कमिटी भाडेकरूंच्या सोयीनुसार,ते जेंव्हा देतील तेंव्हा भाडे घ्यायची.

       आजोबा आमच्या घरी रुळत होते.शेजारीच असलेल्या मशिदीत नमाज अदा करायला जायचे आणि घरी येऊन हार्मोनियम वाजवत बसायचे,असा त्यांचा शिरस्ताच झाला होता.शाळेतून परत आल्यावर मी आजोबांच्या खोलीत घुसायचो.आजोबा मला वेगवेगळ्या कव्वालीच्या धून हार्मोनियमवर ऐकवायचे.नेहमी शांत शांत राहणारे आजोबा हार्मोनियम वाजवताना मात्र पार खुलायचे.त्यांची बोटे हार्मोनियमवर जादूगाराप्रमाणे फिरायची.हार्मोनियम वाजवताना त्यांच्यात एक विलक्षण उत्साह संचारायचा.जादू होती त्यांच्या हातात!त्यांच्या हार्मोनियमचे सूर मला धुंद करीत असत.'भर दो झोली'च्या धूनला तर मी नेहमीच मुकर्रर..मुकर्रर म्हणत असे.आजोबाही मग स्मित करत ती धून पुन्हा वाजवायचे.त्यांच्या सोबतचे ते क्षण कसे निघून जायचे ते कळायचेच नाही.

 "सोहेल गृहपाठ पूर्ण करून घे,"असा माझ्या अम्मीचा आवाज आला तेंव्हाच कळायचे कि आजोबांच्या खोलीच्या बाहेरही एक दुनिया आहे.

       एका रात्री जेवणे आटोपून आम्ही सगळे बसलेलो होतो.त्यावेळी कमिटीचे चेअरमन आमच्या घरी आले.त्यांच्या सोबत मशिदीचे इमामही होते.अब्बूनी त्यांना सलाम करून बसायला चटई अंथरली.घरी येण्याचे कारण विचारले असता आमच्या घरातून येणाऱ्या हार्मोनियमच्या संगीताबद्दल माहिती मिळाली म्हणून आलो असे त्यांनी सांगितले.

"मशिदीच्या प्रॉपर्टीमध्ये हराम काम आम्ही सहन करू शकत नाही.हे असेच चालू राहिले तर तुम्हाला आम्ही चाळीतून काढून टाकू" चेअरमन साहेबांनी चटईवर बसल्याबरोबर दम भरला.

" आमचे वडील आमच्या घरी राहायला आले आहेत.ते वाजवतात हार्मोनियम विरंगुळा म्हणून." अब्बूनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

" इतके बुजुर्ग आहात तुम्ही आता ही मौसिकी सोडून द्या..संगीतचा ठिकाणा दोजख आहे,माहीत नाही का तुम्हाला ?" इमाम साहेबांनी आजोबांकडे पाहत म्हटले.

" बडा कब्रिस्तानमध्ये सापडलेल्या कादिर भाईंच्या जनाज्याविषयी तुम्ही ऐकलं असेलच ना ? अल्लाह अशा धार्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाच जन्नतमध्ये स्थान देतो.हराम काम करणाऱ्या व्यक्तींचा ठिकाणा दोजख आहे.अल्लाह तुम्हाला हिदायत देवो" चेअरमन साहेब आजोबांकडे पाहून कठोरपणे बोलले.

आजोबांनी काहीही उत्तर दिलं नाही.

" यापुढे ह्या घरात हार्मोनियम वाजणार नाही.मी शब्द देतो." अब्बूनी इमाम साहेबांकडे पाहत म्हटले.

त्यानंतर चेअरमन आणि इमाम साहेब निघून गेले.

"मला अंदाज होताच असं काहीतरी होईल म्हणून. मी म्हटलेच होते ही अवदसा ह्या घरात नको म्हणून आलंच ना आता संकट" चेअरमन आणि इमाम साहेब जाताच अम्मी अब्बूकडे पाहत म्हणाली.

अब्बूनी केविलवाणा चेहरा करून आजोबांकडे बघितले.आजोबा तडक खोलीत गेले आणि हार्मोनियम एका कापडात बांधून सज्जावर ते ठेवून दिले.

    हार्मोनियम कापडात कैद झालेले होते.आजोबा आता नमाज अदा करून यायचे आणि तडक आपल्या खोलीत जाऊन कापडात गुंडाळलेल्या हार्मोनियमवरून हात फिरवायचे.मग आराम खुर्चीत विचारमग्न व्हायचे.प्रत्येक दिवस आजोबाला कसा जड जायचा ते मी पाहत होतो.आजोबांना त्यांच्या जीव की प्राण असलेल्या हार्मोनियमपासून दूर करण्यात आले होते.मला फार वाईट वाटायचे.संध्याकाळची आमची मैफलही आता बंद झाली होती.आता केवळ अंधार व्हायचा सायंकाळ नाही.

       एके दिवशी सकाळी अब्बू दुकानावर निघून गेले होते तेंव्हा एक म्हातारे गृहस्थ आमच्या घरी आले.जवळपास आजोबांसारखीच त्यांची वेशभूषा होती.त्यांनी आजोबाला भेटायची इच्छा व्यक्त केली.आजोबा संथ पावलांनी त्यांच्या खोलीबाहेर आले.त्यांच्या चेहऱ्यावर अचानक चमक पसरली.डोळ्यात अश्रू तरळले.करीम...म्हणत ते त्या वृद्ध गृहस्थाच्या गळ्यात पडून खूप रडले.थोडे सावरून त्यांनी त्या वृद्ध गृहस्थाला आपल्या खोलीत नेले.सुमारे तासभर त्यांच्यात गप्पा चालत होत्या.अम्मीने त्यांना चहा नेऊन दयायला सांगितला तेंव्हा मी खोलीत गेलो. ते वृद्ध गृहस्थ त्यांचे गावचे मित्र होते.ते आजोबांना गावातील गैबन पीरच्या उरुसाचे आमंत्रण द्यायला आले होते.

आजोबांनी चहा घेतला आणि थोडावेळ विचार करून ते उठले.कापडात गुंडाळलेली हार्मोनियम खांद्यावर अडकवली आणि त्यांच्या मित्राला उद्देशून म्हणाले,

" चल,आताच गावाकडे निघू "

" पण उरुसाला अजून एक आठवडा बाकी आहे" आजोबांचे मित्र चकित होऊन म्हणाले.

" आता मी अजून गावापासून दूर राहू शकत नाही,तू चल निघ " आजोबा निश्चयाने बोलले.

" ठीक आहे मग चल " आजोबांचे मित्र खुर्चीतून उठत म्हणाले.

माझ्यासाठी आणि अम्मीसाठी हा धक्काच होता.आजोबा असे अचानक गावाकडे जायला निघतील असे कधी वाटले नव्हते.अम्मीने त्यांना थांबण्याची विनंती केली पण आजोबांनी निश्चयच केलेला होता.

" मी पण येतो तुमच्यासोबत " मी हट्ट केला.

" नको बेटा, गावाकडे तुझा सांभाळ करायला कोणीही नाही " आजोबा म्हणाले.

" तुम्ही आहात ना! मी तुमच्याबरोबर राहीन आणि उरूस झाल्यावर तुमच्याबरोबरच परत येईन " मी हट्टाला पेटलो.

आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला.माझ्या केसांत हळुवार हात फिरवत म्हणाले,

" बेटा मी आता परत येणार नाही इकडे "

अम्मी आश्चर्याने आजोबांकडे पाहू लागली.मला रडूच कोसळले.मी त्यांच्या कंबरेला विळखा घालून म्हटले,

" नही दद्दु..ऐसा मत कहो ना "

" बेटा हे शहर माझ्यासारख्या लोकांसाठी नाही..माझ्यासाठी माझे गावच बरे आहे " आजोबांनी आवंढा गिळत म्हटले.

" ते काही नाही,मी पण गावाकडे येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला परत इकडे घेऊन येणार " मी हट्टाला पेटलो

" नाही बेटा हट्ट करू नको,मी तुला घेऊन जाऊ शकत नाही" आजोबांनी असमर्थता व्यक्त केली.

" घेऊन जा त्याला सोबत,मी उरुसाला त्यांना पाठवते तेंव्हा ते घेऊन येतील परत त्याला" अम्मीने काही विचार करून म्हटले असेल.

आजोबा शेवटी तयार झाले.माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

                   बसने आम्ही गावी पोहोचलो.गावच्या चौकात पोहोचताच आजोबाला गावच्या लोकांनी एखादया सेलिब्रिटीला गराडा घालावा तसा गराडा घातला.त्यांची विचारपूस करू लागले.चौकातून आजोबांच्या झोपडीवजा घरापर्यंत ही सगळी मंडळी सोबत सोबत चालत होती.आम्ही घरी पोहोचल्यावरही सगळी लोकं अंगणात उभी होती.आजोबांना हार्मोनियमवर काही तरी धून वाजवायची विनंती करत होती.आजोबांनी हात पाय धुतले आणि अंगणात बोरिया अंथरून त्यावर हार्मोनियम घेऊन बसले आणि 'दम मस्त कलंदर'ची धून वाजवायला सुरुवात केली.लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.आजोबा आणखीनच खुलले.त्यांनी एकानंतर एक अशा वेगवेगळ्या धूनचा सपाटाच लावला.लोकंही दिलखुलासपणे दाद देत होती.आजोबांना माझ्या घरी असताना एवढं आनंदी मी कधीच पाहिलं नव्हतं.संगीताचा एवढा सन्मान करणारी लोकंही मी पहिल्यांदाच पाहत होतो.काही वेळाने हार्मोनियमच्या संगीतात भिजून लोकं पांगली.आम्ही थोडा वेळ आराम केला.आजोबांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता.

     मगरीबची नमाज अदा करून आजोबा घराबाहेर पडले.घरासमोर हातात पाण्याचा ग्लास आणि कडेवर लहान मूल घेऊन अनेक स्त्रिया उभ्या होत्या.आजोबांनी प्रत्येक ग्लास घेऊन त्यावर काही पुटपुटत फुंकर मारली आणि त्या सगळ्या स्त्रिया आपापल्या घरी निघून गेल्या.त्यानंतर आम्ही चौकात गेलो.तिथे कट्टयावर बसलेली मंडळी आजोबांची वाटच पाहत होती.सगळ्यांनी मिळून गावात होणाऱ्या उरुसाचे नियोजन केले.प्रत्येकांनी आपापली जबाबदारी वाटून घेतली आणि बैठक संपली.त्यानंतर आम्ही दादाराव पाटलांच्या घरी जेवायला गेलो.दररोज आम्ही कुणाच्या तरी घरी जेवण करायचो.मला आता कळले होते की आजीचं निधन झाल्यावर जेंव्हा त्यांची सगळी मुले त्यांना गाव सोडायला सांगत होती तेंव्हा माझा गाव मला उपाशी राहू देणार नाही असे आजोबा का म्हणाले होते.

    गावात दिवस फार आनंदाने जात होते.अखेर उरूसचा दिवस उजाडला.गावातील चौक अनेक रंगीबेरंगी दुकानांनी सजले.जवळपासच्या गावातील लोकांनी एकच झुंबड केली होती.अब्बू पण संध्याकाळच्या बसने गावात आले होते.संध्याकाळी गैबन पीर दर्गाहमधून संदल काढण्यात आला.अब्बू,आजोबा आणि मी संदलमध्ये सामील झालो.गावभर फिरून संदल दर्गाहमध्ये परत आला की संदल चढेपर्यंत आजोबांचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम घेण्याची प्रथा होती.संदल परत आला.प्रथेप्रमाणे आजोबांचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम सुरू झाला.'भर दो झोली' ह्या धूनने आजोबांनी सुरुवात केली.लोकांची प्रचंड दाद मिळत होती.आजोबा धुंद होऊन हार्मोनियम वाजवत होते.कार्यक्रम एकदम रंगात आला होता.

दर्गाहचा परिसर संगीतात आणि मुकर्रर मुकर्ररच्या आवाजाने न्हाऊन निघत होता.अचानक आजोबा हार्मोनियमवर कोसळले. एकच गलका झाला.अब्बू धावतच आजोबांजवळ गेले.इतरही लोकं सरसावली.आजोबांना ताबडतोब गावातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.दर्गाह परिसरातील गर्दी आता रुग्णालयाच्या परिसराकडे वळली.अचानक असे काय झाले असाच सर्वांचा सूर होता.डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.रुग्णालयात जमलेल्या जमावाने एकच आक्रोश केला.आजोबांच्या अशा अचानक निघून जाण्याने उरुसाला दुःखाची कळा प्राप्त झाली.अब्बूना काहीच उमजत नव्हते.ते मला छातीशी कवटाळून धाय मोकलून रडत होते.माझ्या डोळ्यांतूनही अश्रू धारा वाहू लागल्या.

       गावातील उरुसाच्या जबाबदार मंडळींनी पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले.आजोबांचा दफन विधी गावातच व्हावा अशी गावकऱ्यांची इच्छा होती. पण अब्बूनी आजमपूरला दफन विधी करण्याचा मानस जाहीर केला.उद्या जोहोरची नमाज झाली की दफन विधी केला जाईल असे त्यांनी जाहीर केले.आजोबांना आजमपूरला नेण्याची व्यवस्था करण्यात आली.

      आजमपूरचा बडा काब्रिस्तान सांगवीच्या लोकांनी भरून गेला.इमाम साहेबांच्या इमामतमध्ये नमाज ए जनाजा अदा करण्यात आली.नमाज संपल्यावर इमाम माझ्या अब्बूजवळ आले आणि म्हणाले,

" अखेर त्यांचा शेवट हार्मोनियम वाजवतानाच झाला,हे दोजखी काम त्यांनी काही सोडले नाही,असो अल्लाह त्यांची मगफिरत करो"

अब्बूला इमाम साहेबांच्या अशा बोलण्याच्या प्रचंड वेदना झाल्याचे मला जाणवले.

दफन विधी झाला.सगळे लोक आपल्याला घरी परतले.

      आजोबांचा मृत्यू होऊन दहा वर्षे उलटून गेली तरीही ते माझ्या कायम स्मरणात आहेत.दररोज सायंकाळी होणारी आमची हार्मोनियम मैफिल मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही.

      एके दिवशी मी कॉलेजमध्ये असताना अब्बूचा कॉल आला.

" बेटा लवकर बडा कब्रिस्तानला ये "

अब्बुच्या आवाजाला कंप सुटल्याचे मला जाणवले.मी चटकन स्कुटी घेऊन निघालो.चौकातल्या पुतळ्याला वेढा घालून बडा कब्रिस्तानला पोहोचलो.कब्रिस्तान जवळ खूपच गर्दी झालेली दिसत होती.अगदी रोडवर सुद्धा काहीतरी चर्चा करत लोकं गटागटात उभी होती.ऑटो,बाईक आणि सायकल अशी वाहने रोडच्या कडेला लावून लोकं कब्रिस्तानच्या गेटमधून घाईघाईने आत जात होती.गेटमधून बाहेर येणारे सगळे अल्लाहु अकबर,अल्लाहु अकबर असे पुटपुटत होते आणि हात वर करून दुआ करत होते.अब्बू गेटजवळ उभे होते आणि आतून येणारे लोक त्यांच्या हात हातात घेऊन दुआ करत होते.अब्बुच्या हाताचे चुंबन घेत होते.मला याचे आश्चर्य वाटले.

" कोणाचा इंतकाल झालेला आहे अब्बू ?" मी अब्बूजवळ जाऊन कानात पुटपुटलो.

" कुणाचाच नाही.." अब्बूनी हळूच उत्तर दिले.

" म्हणजे खोदकाम करताना कुणा एखाद्या वली सिफत माणसाची कबर सापडली असेल,हो ना ?" मी बालपणीचा अनुभव विचारात घेऊन बोललो.

अब्बू काहीच बोलले नाहीत.त्यांनी माझा हात पकडला आणि अक्षरशः ओढतच मला कब्रिस्तानमध्ये नेले.एका कबरीभोवती प्रचंड गर्दी होती.ती दूर सारत अब्बूनी मला कबरीच्या कडेवर उभे केले.मी आत वाकून पाहिले आणि मोठयाने ओरडलो,

" दद्दु ....."

त्या कबरीत माझे आजोबा होते.त्यांच्या चेहऱ्यावर तेज झळकत होते.डोळे मिटून शांतपणे झोपल्याचा भास होत होता.मी आवाज देईन तर ते आता उठून बसतील असेच मला वाटत होते.

" दद्दु...दद्दु " म्हणत मी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

" बेटा,तुझे दद्दु वली सिफत व्यक्ती आहेत.लोकांनी ज्यांचा सन्मान केला नाही पण अल्लाहने त्यांचा सन्मान केला" अब्बू शाश्रु नयनांनी बोलले.

"निश्चितच अल्लाह नेक व्यक्तींचा उचित सम्मान करतो"

मी अभिमानाने बोललो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama